नागपूर – रात्रकालीन शाळा शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी घंटानाद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. घंटानाद आंदोलन दरम्यान सरकारच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी शंखनादही केला.शहराच्या संविधान चौकात रात्रकालीन शाळेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे हे बेमुदत आंदोलन गेले काही दिवस सुरु आहे.
सरकारने ३० जून २०२२ ला काढलेला जीआर हा राज्यातील 176 रात्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि यात कार्यरत अर्धवेळ मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पोटाची भाकर हिरावणारा आहे. त्यामुळे शासनाने हा जीआर तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी रात्रकालीन शाळेतील शेकडो शिक्षक, शिक्षिकानी घंटानाद आणि शंखनाद आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना राज्य सरचिटणीस महेश विलास जोशी, उप शहर अध्यक्ष नितीन किटे यांनी दिली.