आज १९ एप्रिल जागतिक यकृत दिन.

0

या निमित्ताने एक प्रेरक सत्यकथा-

कथा : १
इसवी सन २००३
स्थळ – सुंदरम मेडिकल फाउंडेशन रुग्णालय, चेन्नई.
सिस्टर कन्नम्बा या, त्यांची मुलगी डॉ. चित्रा यांना रुग्णालयाच्या ड्युटीवर सोडून त्यांच्या कायनेटिक होंडा वरून परत चालल्या होत्या. रस्त्यावरचा एक विचित्र स्पीडब्रेकर असाच रस्त्यामधे मध्येच उगवलेला. त्या स्पीड ब्रेकरची अचानक या कायनेटिक होंडाशी धडक होते. सिस्टर कन्नम्बा स्कूटर वरून खाली पडतात आणि त्यांच्या डोक्याला जबर इजा होते. तेथील जमलेल्या लोकांनी त्वरित ॲम्बुलन्सला बोलवून त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. डॉ. चित्रा यांना आपल्या आईचा अपघात झाला हे समजताच त्या तातडीने आयसीयू मध्ये दाखल झाल्या. आईला त्वरित उपचार सुरू झाले. व्हेंटिलेटर आधीच लावलेला होता. एकेक टेस्ट आणि उपचार. सर्व तज्ञ डॉक्टर्स आपल्या सहकारी भगिनीच्या आईला योग्य आणि त्वरित उपाययोजना करता यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. दोन दिवस उपचार करूनही रुग्ण सिस्टर कन्नम्बा केलेल्या उपचारांना प्रतिसाद देत नाहीत, हे पाहून डॉ चित्रा यांच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. त्वरित ॲप्निया टेस्ट करण्यात आली. त्यांची शंका खरी ठरली. सिस्टर कन्नम्बा मेंदूमृत म्हणजेच ब्रेनडेड झालेल्या होत्या. व्हेंटिलेटर चालू होताच. सहा तासाने दुसरी‌ म्हणजेच कन्फर्मेटरी ॲप्निया टेस्ट करायची होती. डॉ. चित्रा मनावर ताबा ठेवून पटकन डॉक्टरांच्या रेस्ट रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन दोन मिनिटे शांतपणे विचार करत बसल्या काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये मोहन फाउंडेशनच्या डॉ. ललिता रघुराम येऊन गेल्या होत्या. त्यांनी ऑर्गन डोनेशन बाबत सर्व डॉक्टर्सचे प्रबोधन केले होते. त्यामुळेच या सर्व प्रोसेस त्वरित चालू झाल्या होत्या. डॉक्टर चित्रा शांतपणे स्वतःच्या दुःखाला आवर घालत मनोनिग्रह करीत होत्या. तेवढ्यात त्यांना आठवलं कालच दूरदर्शनवर एक जाहिरातीची स्ट्रीप त्यांच्या वाचनात आली होती.
‘वन यंग डॉक्टर नीड्स लिव्हर प्लीज कॉन्टॅक्ट ग्लोबल हॉस्पिटल, हैदराबाद फोन नंबर xyzxyz’
ती जाहिरात आठवली आणि त्या त्वरित विजेच्या वेगाने हालचाली करीत फोन कडे धावल्या. ग्लोबल हॉस्पिटल हैदराबादचा फोन नंबर ऑपरेटर कडून मागून घेतला आणि त्वरित फोन लावला एका ब्रेनडेड पेशंटचे हृदय उपलब्ध आहे हे सांगून त्वरित संपर्क संपर्क करण्यास सांगितले.
ललिता रघुराम यांनाही त्यांनी फोन केला. अर्थात तोपर्यंत ॲप्निया ची दुसरी टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आली होती. डॉ. चित्रा अक्षरशः विजेच्या चपळाईने हालचाली करत युद्ध पातळीवर सगळ्या गोष्टींचं नियोजन करत होत्या. हैदराबादच्या ग्लोबल हॉस्पिटल बरोबर फॅक्स वर रिपोर्टची देवाण-घेवाण झाली. ब्लड ग्रुप जुळत होता. सिस्टर कन्नम्बा यांचे लिव्हर उत्तम स्थितीत होते. त्या अतिशय करूण आणि दुःखद प्रसंगी सुद्धा अंतर्मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक कृतकृत्यतेचे बीज उगवत होते. समाधानाची छोटीशी लहर त्या बिजावर फुंकर घालत होती. डॉ ललिता रघुराम या सुद्धा चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही ठिकाणी समन्वय साधत होत्या.
तिकडे हैदराबादच्या रुग्णालयातही फोन आल्यानंतर विजेच्या चपळाईने आणि युद्ध पातळीवर सर्व हालचालींना सुरुवात झाली. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. प्रत्यक्ष अवयव काढण्यासाठी पहाटे चार वाजता सुरुवात होणार होती आणि हैदराबादच्या हॉस्पिटल ची टीम पहाटे दोन वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक होते. मोठा पेच प्रसंग होता. काय करावे काही सुचत नव्हते. एवढ्यात ललिता मॅडम ना आठवले काही दिवसापूर्वीच त्यांची भेट डेक्कन एअरवेजच्या प्रतिनिधीशी झाली होती. त्याचे कार्ड होतेच. त्वरित त्यांनी संपर्क साधला. डेक्कन एअरवेजकडे हेलिकॉप्टर उपलब्ध होते.. त्यांनी हैदराबादला संपर्क साधला. सौ सुप्रिया भाऊसाहेब मोरे यांनी त्वरित चार्टर फ्लाईट साठी मान्यता देऊन ताबडतोब सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे योग्य वेळी हैदराबादची टीम चेन्नईला पोहोचली. या सगळ्या गोष्टी अत्यंत त्वरेने आणि चपळाईने घडवल्या गेल्या. हा योगायोग म्हणावा की एखाद्याचे नशीब बलवत्तर म्हणावे की कुणाची तरी कृपा म्हणावी? विचारांच्या गुंत्यात पडायची ती वेळच नव्हती. ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे दोन वाजता हैदराबादच्या डॉक्टरांची टीम आली. पहाटे चार वाजता यकृत (लिव्हर) काढून घेऊन ती टीम त्याच वेगाने हैदराबादला पोहोचली. हैदराबाद येथे युद्धपातळीवर धावपळ चालू होतीच. पेशंट ऑपरेशन थिएटर मध्ये दाखल झाला होता. सर्व तज्ञ डॉक्टर्स तंत्रज्ञ हजर होतेच. यकृत (लिव्हर) पोहोचताच शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. तब्बल 13 तास शस्त्रक्रिया चालू होती. त्यानंतर डॉक्टरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
नाशिकचे डॉ. भाऊसाहेब मोरे यांचे नशीब बलवत्तर किंवा आपण असं म्हणू की सौ. सुप्रियाताईंचे जे काही प्रयत्न, त्यांनी केलेल्या उपासना, त्यांची खडतर तपश्चर्या या सगळ्यांचा हा परिपाक. म्हणूनच मी असे म्हणेन की सुप्रियाताईंच्या अंगात सावित्रीचा संचार झाला होता आणि डॉ. भाऊसाहेब मोरे या नाशिकच्या सत्यवानाचा पुनर्जन्म झाला.
भारत देशा मधील ‘यकृत प्रत्यारोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया’ त्यादिवशी पार पडली. आज वीस वर्षे झाली. डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांना हे सर्व आठवून आठवून आजही आश्चर्य वाटतं. गेले वीस वर्ष या प्रत्यारोपित यकृतामुळे त्यांचं आयुष्य परत मिळालं. पाच ते दहा दिवसात जर यकृत उपलब्ध झाले नसते, तर आज डॉक्टर भाऊसाहेब मोरे आपल्यात नसते. ऑपरेशन नंतर पत्रकारांची रीघ लागली. डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांनी त्यांना उत्तर देताना सांगितले “ज्या अवयवदानामुळे मला माझा पुनर्जन्म लाभला त्या अवयवदानाच्या कार्यासाठी माझं उर्वरित आयुष्य मी अर्पण करणार आहे. ” गेली वीस वर्ष हा अवयवदानाचा महायज्ञ डॉ. भाऊसाहेब मोरे हे नाशिक येथे, आजूबाजूला ग्रामीण भागात आणि त्यांना जेथे बोलावतील तेथे हजर राहून हे जनजागृतीचं यज्ञकुंड सतत धगधगत ठेवत असतात. सौ सुप्रिया ताई यांनी भाऊसाहेबांसाठी जे प्रयत्नवादाचे शिवधनुष्य उचलले त्याला अलीकडच्या काळात तोड नाही. त्याबाबत डॉ. भाऊसाहेबांच्या तोंडूनच ऐकावे. परंतु अवयवदानाची ही यशस्वी महागाथा आणि हे महादानाचं धगधगतं यज्ञकुंड त्यांनी मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन या संस्थेच्या स्वरूपात पुढील पिढ्यांसाठी चालू ठेवलं आहे. या संस्थेच्या माध्यमातून डॉ मोरे अवयवदानाचे पवित्र कार्य समाजप्रबोधनाद्वारे पुढे नेण्याचे काम, स्नेही सुनिल देशपांडे व इतर सहकारी यांचे सहाय्याने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर सर्व भारतभर करीत आहेत.
ऋषिकेश हॉस्पिटल च्या माध्यमातून प्रत्यक्ष अवयव प्रत्यारोपणाचं कार्यही चालू ठेवलं आहे. सौ सुप्रियाताई यांना नमस्कार आणि डॉ भाऊसाहेब यांना सलाम! आपणही या यज्ञात त्यांची साथ देऊया. हे कार्य सतत चालू राहील यासाठी कटिबद्ध होऊ. आपल्या गावातला महादानाचा वरदहस्त लाभलेला एक सुदैवी सत्यवान व त्याची सहचारिणी सावित्री यांची ही प्रेरक कथा.
एका यशस्वी अवयव प्रत्यारोपणातून आणि मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन या संस्थेच्या उभारणीतून तसेच चेन्नईच्या डॉ. चित्रा यांच्या महादानातून निर्माण झालेली, ही चळवळ, पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील यात शंका नाही.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा