Home Top News Travels huge in ticket prices

Travels huge in ticket prices

0
ट्रॅव्हल्स-तिकिट-दरांमध्ये-प्रचंड
ट्रॅव्हल्स-तिकिट-दरांमध्ये-प्रचंड

ट्रॅव्हल्स तिकिट दरांमध्ये प्रचंड
वाढ : तक्रारीचे संपर्क क्रमांक बंद
ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा आरोप

नागपूर,
ऐनदिवाळीच्या काळात खासगी प्रवासी बस चालकांकडून पुन्हा तिकिट दरांमध्ये वाढ करत प्रवाशांची लूट चालू झाली आहे. सुट्ट्या आणि सण यांच्या काळात प्रवासासाठी अधिक तिकिट दराचा भुर्दंड भरावा लागणारच, अशी धारणा सर्वसामान्यांची झाली आहे.
दिवाळीच्या दरम्यान प्रवाशांना, आयत्यावेळी खाजगी वाहनाद्वारे जागा मिळविताना तिकिटांचे मनमानी शुल्क मोजावे लागते. खाजगी ट्रॅव्हल्सकडून बस तिकिटाचे मनमानी दरवाढ करून लुटले जात आहे. अशा खाजगी ट्रॅव्हल्सवर आरटीओने तातडीने कारवाई करून प्रवाशांना दिलासा द्यावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, प्रांत सचिव लीलाधर लोहरे आणि प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन मुकेवार यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
दरम्यान, खाजगी ट्रॅव्हल्स विरोधात विशेष अभियान वाहतूक विभागातर्फे २१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर राबवित आहे. पुणे, नाशिक, हैदराबाद या मार्गावर ३०० टक्के अधिक म्हणजे एक हजार ऐवजी ३ हजार रुपये आकारत आहेत, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
याचे समाधान करण्यासाठी वाहतूक आयुक्त विवेक भिमनवार यांनी भाडेवाढ मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे प्रादेशिक परिवहनचे सहाय्यक अधिकारी मनोज ओतारी यांनी निवेदन घेताना सांगितले. निवेदन देताना ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ प्रांत सचिव लीलाधर लोहरे, प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन मुकेवार, नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. बिप्लब मजुमदार, जिल्हा सचिव मुकुंद अडेवार, सहसचिव आनंद लुतडे, संपर्क प्रमुख प्रशांत लांजेवार आणि ग्रामीण संघटक श्रीराम सातपुते उपस्थित होते.
सध्या नागपूर ते पुणे खाजगी ट्रॅव्हल्सचे आजचे ऑन लाईन भाडे ७६० ते १००० रुपये, तर दिवाळीनंतर – म्हणजे २ नोव्हेंबर नंतर – हेच भाडे ३३०० ते ४००० रुपये राहील. सध्या बस भाडे पुणे नॉन एसी स्लीपर १५९५ रुपये, शिवशाही एसी स्लीपर १६०५, हिरकणी १४९५, तर हैदराबाद ऑरडीनरी बस ७४५, शिवशाही एसी ११७५ आहे, असे नितीन मुकेवार यांनी सांगितले.
प्रशासनाने प्रवासांच्या मदतीकरिता हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रने केली आहे.
२०१८ मध्ये राज्य शासनाने आदेश काढला आणि प्रवासी बसचे तिकिटदर निश्चित केले. परंतु, ६ वर्षे होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आदेशात अधिक तिकीटदर आकारणार्‍या खासगी बस चालकांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी (०२२) ६२४२६६६६ आणि १८००२२०११० हे दोन संपर्क क्रमांक दिले होते. ते सध्या बंद आहेत. ते बंद का आहेत? हे संपर्क क्रमांक तत्काळ चालू करून ते २४ तास चालू रहायला हवेत, असेही ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या प्रदेश प्रवासी महासंघाने या निवेदनात म्हटले आहे.