(bread)भाकरी ही गोरगरीबाच्या पोटाचा आधार असं आपण आतापर्यंत केवळ ऐकत नाही आलो तर अनुभवत आणि समजत आलो. ही भाकरी मिळवताना शरीराने केलेले काबाडकष्ट, जीवाची होणारी काहीली, पायाने केलेली धावपळ, हातांनी उचललेला न पेलवणारा भार, बळीराजाच्या प्रत्येक रंध्रातून पाझरणारा घाम हे सारं सारं क्षणात नजरेसमोर यायला लागतं. श्रीमंतांना गव्हाच्या नरम मुलायम पोळ्या आणि गोरगरीबांची जाड, कडक लाकडांच्या आगीवर भाजलेली भाकर, त्यासोबत कांदा हेच अन्न. ह्या भाकरीनी श्रीमंत आणि गरीब ह्यातील तफावत अगदी सहज दर्शवून दिली. ह्या दोन टोकांना ह्या भाकरीनी अनेक वर्ष दूरच ठेवलं. ठेचा, कांदा आणि भाकर ह्याला अमृत समजून सेवन करणारी, ज्या ज्वारीच्या पिठापासून ही भाकरी बनवल्या जाते त्याच पिठापासून बनवलेल्या आंबीलीचा ग्लासभर सेवनातून उर्जा मिळवणारी आमची पिढी खरंच समाधानी नक्कीच होती आणि अजूनही आहे.
ह्या अशा गरीबाच्या भाकरीनी, झुणका, ठेचा, बेसण, कांदादाळ वगैरे पदार्थांनी हळूच मोठमोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये कधी प्रवेश केला हे कळलेच नाही आणि तेही अत्यंत महागड्या किंमतीत. ह्या भाकरीने श्रीमंतांच्या घरातही प्रवेश केला आणि त्यांनी आयोजीत केलेल्या (Food ceremony)भोजन समारंभ, (the parties) पार्ट्या, (Even in rows) पंगतींतही. ह्या उच्चभ्रूंच्या सहवासात भाकरी गेली किंवा उच्चभ्रूंनी तिला पळवली तेव्हापासून तिचा भाव वाढला, अगदी गव्हाच्या दरापेक्षाही, अगदी आमच्यासारख्यांच्या आवाक्यापलिकडे.
आता ह्या भाकरीने राजकीय परीघाच्या आंतही प्रवेश केलेला दिसू लागलेला आहे. भाकरीचा उल्लेख राजकारणातही आताशा वारंवार होऊ लागलेला आहे. विशेषत: राजकारणात अनेक दशकांपासून मुरलेल्या ज्येष्ठ राजकारण करणाऱ्यांनी आता तिला शाब्दीक रुपातही जवळ केलं, अगदी त्याचा बालपणापासून आस्वाद घेतला असूनही.
राजकारणात ‘भाकरी फिरवणे’ हा उल्लेख आला आणि भाकरीसाठी केलेल्या काबाडकष्टांना, आगीनी भाजलेल्या हातांना काय वाटले असेल हे कळण्यापलिकडे आहे. भाकरी तयार करायला कष्ट करून ज्वारी पिकवावी लागते, निसर्गाच्या लहरीपणापासून तिला वाचवावे लागते, त्याचं पीठ तयार करताना जातं शक्ती लावून फिरवावं लागतं, गरम पाण्यानं हाताला सांभाळत पीठ व्यवस्थित मळावं लागतं, त्या मळलेल्या पिठाची भाकरी दोन्ही हातांच्या पंजांच्या सहाय्याने छान वर्तुळाकार थापून चुलीवरच्या आगीवर तप्त होत असलेल्या तव्यावर साध्या पाण्याच्या हातानी पसवावी लागते, योग्य तेवढा शेक मिळाल्यावर वरचा भाग शेकून शिजवायला सराट्याने खालचा भाग वर करावा लागतो, पूर्ण तयार झाल्याची खात्री झाल्यावर ती तव्यावरच थोडी थोडी फिरवावी लागते आणि शेवटी ती चुलीच्या निखाऱ्यांशेजारी गरम राहण्यासाठी लावून ठेवावी लागते, जळणार नाही ही खात्री करून.
हे भाकरीचं एवढं तंत्र पाळण्याचे कष्ट, सवय, संयम आणि वेळ पाळण्याची तयारी आजकालच्या राजकाणातील मंडळींना खरंच जमणार आहे काय? ती भाकरी तयार होईल काय? राजकीय तप्त वातावरणात ही भाकर फिरवणं जमणार आहे काय? फिरवलेली भाकरी सर्वार्थांनी योग्य खरंच रुचकर होणार काय? खाणाऱ्यांच्या पचनी पडणार आहे काय? आणि महत्वाचं म्हणजे ही फिरवलेली भाकरी सर्वांनाच आवडणार आहे काय? म्हणजे हे भाकरी फिरवणं खरंच यशस्वी होणार आहे काय?
काहीही म्हणा परंतु ह्या फिरवणाऱ्या भाकरीने, राजकीय अदलाबदली प्रकरणाच्या विचारमंथनाने अनेकांच्या छातीत धडकी नक्कीच भरवलेली आहे. महत्वाचे म्हणजे ज्वारीच्या योग्यतेवरच ती भाकरी पूर्ण व्यवस्थीत फिरवता येईल की फिरवताना तिचे तुकडे पडतील हे बघणे महत्वाचे ठरेल.
बघुया पुढे काय काय होते ते.
(Madhusudan (Madan) Puranika)मधुसूदन (मदन) पुराणिक