नागपुरात दोन बालकांचा होरपळून मृत्यू

0

शहराच्या हजारीपहाड परिसरातील दुर्घटना

नागपूर, 19 जानेवारी  : नागपूरच्या सेमिनरी हिल्सी नजीकच्या हजारीपहाड येथील गोविंद गौरखेडे कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी रात्री एका कच्च्या घराला भीषण आग लागली. यात देवांश उईके (वय 7) आणि प्रभास उईके (वय 3) या सख्ख्या भावंडांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. थंडीपासून बचावासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे आग लागून ही दुर्घटना घडली.

यासंदर्भातील माहितीनुसार दीपाली उईके गोविंद गौरखेडे कॉम्प्लेक्समधील कच्चा घरात आपल्या 4 मुलांसह घटनास्थळी वास्तव्याला होती. घटनेच्या वेळी गुरुवारी रात्री 10 वाजता दीपाली कामानिमित्त बाहेर गेली होती. थंडी पासून बाचावासाठी घरात शेकोटी पेटवली होती. रात्री 10 वाजेच्या सुमारास या शेकोटीने अचानक पेट घेऊन आग लागली. काही वेळातच आग संपूर्ण घरात पसरली. घर वस्तीपासून काहीसे बाजुला असल्याने चिमुकल्यांचा आरडाओरडा लोकांना ऐकू देखील गेला नाही. त्यांच्या 10 वर्षीय मोठ्या बहिणीने कसाबसा बाहेर पळ काढला. मात्र देवांश व प्रभास हे आगीच्या विळख्यात सापडले. काही वेळातच त्यांचा जळून मृत्यू झाला. दरम्यान मुख्य रस्त्यावरून एका व्यक्तीला आगीचे लोट दिसले. त्याने धाव घेतली असता हा प्रकार लक्षात आला. अग्निशमन विभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. दोन्ही भावांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात गिट्टीखदानचे ठाणेदार महेश सांगळे यांच्या नेतृत्वातील पोलिस पथक घटनेचा तपास करीत आहे.