
नागभीड तालुक्यातील पारडी-गायमुख परिसरात रविवारी सकाळी रानटी डुकराने धुमाकूळ घालत दोन व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला. या भीषण घटनेत दोन्ही इसम गंभीर जखमी झाले असून, परिसरात सध्या भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शंकर मीराशे हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या रानटी डुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, मीराशे यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
याचवेळी जवळच आंबे तोडण्यासाठी गेलेले माधव ढोरे हे मीराशे यांच्या मदतीला धावून आले. मात्र, पिसाळलेल्या डुकराने ढोरे यांच्यावरही झडप घालून त्यांना गंभीररीत्या जखमी केले.
गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना प्रथमतः ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, वनाधिकारी व कर्मचारी पुढील तपास करत आहेत. वनविभागाने नागरिकांना शेतात किंवा जंगल परिसरात जाताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.















