रेल्वेचे दोन महिन्यांचे बुकिंग फुल्ल

0

पुणे (Pune), 27 मार्च,  उन्हाळी सुट्टयांमध्ये बाहेरगावी फिरायला जाताय आणि तेही ट्रेनने जात असाल तर थांबा… आधी तिकिट उपलब्ध आहे का याची पाहणी करा. कारण, उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे पुढील दोन महिन्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

उन्हाळी सुट्टयांमध्ये रेल्वेचा मोठी गर्दी असते. काही नागरिक शाळा व कार्यालयांच्या सुट्ट्या जुळून आल्यानंतरच नियोजन करतात. तर नागरिकांकडून दक्षिणेतील व उत्तरेतील ठिकाणांना सुट्ट्यांच्या काळात पर्यटनासाठी प्राधान्य दिले जाते. त्यासाठी रेल्वेचे तिकीट १२० दिवस आधीपासून आरक्षित करण्यात येते.त्यामुळे अनेकांनी आधीपासूनच तिकीट बुक करण्यास सुरूवात केली आहे. आता जे प्रवासी बाहेरगावी अथवा आपल्या मूळ गावी रेल्वेने जाण्याचा विचार करत आहेत, त्यांना इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य रेल्वेकडून ट्रेनला वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्या सोडण्याचे व फेऱ्या वाढविण्याचे नियोजन केले जाते.