८ लाख ग्राहकांकडे १२४ कोटीची थकबाकी

0

पुणे (Pune ), 27 मार्च, पश्चिम महाराष्ट्रात सद्यःस्थितीत ८ लाख ८७ हजार घरगुती ग्राहकांकडे १२४ कोटी ६१ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. तर १ लाख ८ हजार व्यावसायिकांकडे ३७ कोटी ९५ लाख, तसेच १६ हजार ५७० उद्योगांकडे १८ कोटी ६५ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १० लाख १२ हजार ३५० ग्राहकांकडे १८१ कोटी २२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून प्रादेशिक संचालक अंकुश नाळे पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावर असून थेट शाखा कार्यालयापर्यंत वीजबिल वसुलीचा आढावा घेत आहेत. सोबतच मुख्य अभियंता राजेंद्र पवार, सुनील पावडे व परेश भागवत यांच्यासह सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी आणि विशेष पथके थकबाकी वसुलीसाठी रस्त्यावर उतरली आहेत.

ग्राहकांकडून केवळ वीजबिल नियमित भरण्यास फारसे प्राधान्य दिले जात नसल्याचे आढळून येत आहे. त्यातून थकबाकी वाढत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोय होणे आदी टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ग्राहकांनी ताबडतोब भरावी, असे आवाहन प्रादेशिक संचालक नाळे यांनी केले आहे.