

– ‘‘करुणाश्रम’’ चे संचालक आशिष गोस्वामी यांना प्रदान केला जाणार
नागपूर (Nagpur), 19 मार्च
वनराई फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून शुक्रवार, 21 मार्च रोजी सायं. 5 वाजता ‘स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार- २०२५ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
वनसंरक्षणाबाबत भरीव कार्य करणार्या व्यक्ती किंवा संस्थेला दरवर्षी हा पुरस्कार जागतिक वनदिनानिमित्त दिला जातो. 2025 सालचा हा पुरस्कार वर्धा येथील ‘‘करुणाश्रम’’ या संस्थेचे संचालक आशिष नारायण गोस्वामी यांना प्रदान करण्यात येणार आहेत. 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आशिष गोस्वामी यांनी करुणाश्रममध्ये बचाव केलेले तसेच, पाळीव प्राण्यांसाठी आश्रयस्थान विकसीत केले असून 30 हून अधिक प्रजातीचे पक्षी नैसर्गिक वातावरणात तेथे वास्तव्यास आहेत. याशिवाय, त्यांनी अनेक देशी वनस्पतींच्या जातींचेदेखील जतन केले आहे.
श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक येथे होणार्या या कार्यक्रमात पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते हा पुरस्कार आशिष गोस्वामी यांना प्रदान करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय पाटील व वनराई फाऊंडेशन द्वारे करण्यात आले आहे.