

नागपूर (nagpur), 17 मार्च
सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालय, नागपूर आणि महिला महाविद्यालय, अमरावतीतर्फे ‘इंटेलेक्युचअल प्रॉपर्टी राईट्स’ या विषयावर सोमवारी ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे स्तरावर आयोजन करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लायब्ररी सायन्स विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला हिरवडे यांनी या विषयाची विस्तृत माहिती दिली. चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सी. पी. अॅण्ड बेरार कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद जोशी, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश मोहरील, आयपीआर सेलच्या डॉ. मेधा कानेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मंगला हिरवडे यांनी नागपुरातील राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्युचअल प्रॉपर्टी राईट्समध्ये त्यासंदर्भात अभ्यासक्रम राबवले जातात असे सांगताना संशोधन आणि संशोधनाचे संरक्षण या दृष्टीने महत्वाचा व प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणारा हा विषय प्रेझेंटेशनने सुलभ करुन उलगडून दाखविला. अतिशय बारकाईने त्यांनी इंटेलेक्युचअल प्रॉपर्टी राईट्समधील प्रमुख मुद्दे पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, औद्योगिक डिझाईन, भौगोलिक संकेताबद्दलच्या संकल्पना विस्तृतपणे सांगितल्या.
आयपीआर हे आविष्कार, साहित्य, कलाकृती, डिझाईन, चिन्हे, नावे आणि वाणिज्यमधील प्रतिमा अशा मूळ सर्जनशील कार्यांना संरक्षण प्रदान करतात, असे त्या म्हणाल्या. प्राचार्य मोहरील यांनी समारोपीय भाष्य केले. उपस्थितांचे आभार संयोजक शालीनी पांडे यांनी मानले.