वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

0

मनोज जरांगेंच्या सोबतीने निवडणुकीत उतरण्याची घोषणा

अकोला (Akola), 27 मार्च  : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेसोबत वंचित निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी आज, बुधवारी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

यावेळी महाविकास आघाडीपासून (मविआ) अंतर राखण्याची घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाच्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोला मतदारसंघातून लढणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर सांगलीत प्रकाश शेंडगे हे उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा देऊ असे आंबेडकरांनी जाहीर केले. मनोज जरांगे हा फॅक्टर लक्षात घ्यावा अशी विनंती आम्ही मविआला केली होती. मात्र, आमच्या म्हणण्याकडं दुर्लक्ष केले असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. त्यासोबतच आंबेडकरांनी सांगितले की, वंचित आघाडी निवडणुकीत मुस्लिम आणि जैन समाजातील उमेदवार उतरवणार असून त्यांना निवडून देखील आणले जाईल.

वंचित बहुजन आघाडीने संजय गजानन केवट (भंडारा गोंदिया), हितेश पांडुरंग मढावी (गडचिरोली-चिमूर), राजेश बेले (चंद्रपूर), वसंत राजाराम मगर (बुलढाणा), प्रकाश आंबेडकर (अकोला), प्राजक्ता तारकेश्वर टिल्लेवार (अमरावती), प्रा. राजेंद्र साळुंखे (वर्धा), खिमसिंग प्रतापराव पवार (यवतमाळ-वाशिम) यांना उमेदवारी दिलीय. तर नागपुरातून विकास ठाकरे आणि सांगलीतून प्रकाश शेंडगे (उभे राहिल्यास) पाठिंबा देण्याची घोषणा केलीय.