
नागपूर(Nagpur),
ओला, उबेरमध्ये बुकिंग करूनही विना एसी ने प्रवास करावा लागणे, भोजन समारंभात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीरचा सर्रास वापर होणे, रस्त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी फूटपाथ मोकळे न राहणे, रामटेक – नागपूरसाठी अतिरिक्त बसेस नसल्याने प्रवाशांचे होणारे हाल, मनपा, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी अनुपस्थित राहणे, तरुणांमध्ये ड्रग्सच्या अधीन राहण्याचे प्रमाण वाढणे , खाजगी रुग्णालयात औषधे तेथील दुकानातूनच खरेदी करण्यास ग्राहकांवर दबाव आणणे, नूडल्स मंचुरियनमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होणे, डेली निडस, किराणा , पान अँड ज्यूस कॉर्नर, आईस्क्रीम पार्लर येथे एमआरपी पेक्षा पाच रुपये जास्त दराने वस्तूची विक्री होणे तसेच वॉटर कॅन्स, पाणी बॉटल्स विक्रीच्या ठिकाणी आरओ प्लांटची तपासणी होणे आणि आयएसआय मार्कशिवाय जास्त दरात विक्री होत असल्याने फूड अँड ड्रग विभागाने याची कसून करावी, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी केली.
दरमहा होणारी बैठक 5 मार्च 2025 नंतर 27 मे 2025 रोजी ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहर पुरवठा अधिकारी विनोद काळे, वजन – माप अधिकारी विजय झोटे आदी उपस्थित होते. ग्राहकांच्या वरील समस्यांबाबत संबंधित विभाग प्रमुखांकडून उत्तर मागविण्यात येऊन, या समस्या मार्गी लावण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल, ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आनंद पडोळे यांनी दिले.
बैठकीला अशासकीय सदस्य श्यामकांत पात्रीकर, कांचनमाला माकडे, प्रशांत लांजेवार, ज्योती शर्मा, चौधरी आदी उपस्थित होते.