
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न
चंद्रपूर (Chandrapur) :इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने दहावी उत्तीर्ण झालेल्या व अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या अडचणींवर मात करुन नोंदणी प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी स्थानिक जनता महाविद्यालय येथे अकरावी प्रवेश मार्गदर्शन व मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या सत्रापासून प्रथमच अकराव्या वर्गाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता एक वेबसाईट देण्यात आलेली आहे. त्या वेबसाईट वर जावून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करुन प्रवेशकरिता कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळा निवडायची आहे. त्यानंतर प्रवेशाकरिता राऊंड सुरु होणार आहेत. मात्र या प्रक्रियेत सर्व्हर बंद पडणे, स्लो स्पीड, ऑप्शन फॉर्म भरण्यात अडचण, शैक्षणिक कागदपत्र अपलोड न होणे, वारंवार एरर येणे, आदी तांत्रिक अडचणी मुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतो आहे. यावर निश्चित अशा उपाययोजना करणे देखील कठीण आहे.
यामुळे विध्यार्थ्यांना सोयीचे व्हावे, अडचणींवर मात करता यावी, विद्यार्थ्यांशी सुसंवाद व्हावा, त्यांचे प्रवेश संबंधित प्रश्न सोडविता यावे, या करीता स्थानिक जनता महाविद्यालय येथे अकरावी प्रवेश मार्गदर्शन व मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत आहे. निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करुन देण्यात येत आहे, या मदत कक्षाचा लाभ अकरावी वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन कक्ष प्रतिनिधी यांनी केली आहे.