अवकाळीचा विदर्भात सर्वदूर फटका

0

वीज पडून दोघांचा मृत्यू ; जनावरं दगावली ; पिकांचे अतोनात नुकसान

नागपूर. शुक्रवारी दुपारनंतर अवघ्या विदर्भालाच अवकाळी पाऊस आणि वादळाने अगदी झोडपून काढले (Vidarbha was ravaged by unseasonal rains and storms). विदर्भात सर्वदूर मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. पिकांची अतोनात हानी (Severe damage to crops ) झाली आहे. पण, शुक्रवार, शनिवार, रविवार सलग सुट्या असल्याने नुकसानीचा नेमका आकडा पुढे येण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपूर येथे गोपाल मनोहर करपती यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर विनायक जयराम ठाकर, जगदीश मंडाळे जखमी झाले. अकोला जिल्ह्यातही मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर दहा शेळ्या मरण पावल्या. यवतमाळातही दोन बैल व गाय दगावले. अनेक घरांचीही पडझड झाली आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भात सर्वत्र शेतकऱ्यांचे रूंदण सुरू आहे. त्यातच शनिवारी सकाळपासून सर्वदूर पावसाचे वातावरण असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.
शुक्रवारी अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. मध्यरात्रीपासून सुरू असलेला पाऊस अजूनही कायम आहे. अकोला जिल्ह्यात रात्री अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातही वादळी पावसामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले. वर्धा जिल्ह्यातही रात्री अनेक भागांत गारपीट झाली. पुलगावला पावसाने झोडपले. शनिवारीदेखील पाऊस कायम होता. गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसासह वादळाचा तडाखा बसला. दक्षिण गडचिरोली भागाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर यवतमाळ जिल्ह्यातही पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यातदेखील सकाळपासूनच रिमझिम पावसाची सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह रात्रभर पावसाने हजेरी लावली. तर शनिवारीदेखील ढगांच्या गडगडाटास पाऊस कायम होता. शेतातील भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या उन्हाळी पिकांनादेखील मोठा फटका बसला आहे. हवामान विभागाने विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे दोन दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. आता सरकारनेच शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होते आहे.