शरयूतीरी महाआरतीत सहभागी होणार : अन्य मंत्र्यांचा देखील सहभाग
मुंबई mumbai: राज्यात सर्वत्र सध्या शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याचीच चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह शनिवारीच लखनऊमध्ये दाखल झाले होते. आज ते अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. सर्वजण अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यानिमित्त अयोध्यानगरी भगव्या रंगात सजविली गेली आहे. हा शिवसेनेचा दौरा (Shiv Sena tour) असल्याचा दावा केला जात होता. पण, आता अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा (Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) अयोध्येकडे रवाना झाले आहेत. भाजपाचे मंत्रीसुद्धा या दौऱ्यात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरयूतीरी महाआरती करणार आहेत. त्यासाठी भव्य व्यासपीठ देखील तयार करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांसह या महाआरतीत सहभागी होतील. भाजप नेत्यांच्या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हिंदूत्वाच्या मुद्यावरून आम्ही बंड पुकारले असल्याचे शिंदे गटाच्या आमदार, खासदार, कार्यकर्त्यांकडून सातत्याने सांगितले जात आहे. त्यातच शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यांची घोषणा करण्यात आली. यामुळे राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली. हिंदूत्वाचा मुद्दा पुढे नेण्यासाठी हा दौरा निश्चित केला गेल्याचेही अर्थ काढले जात आहे. १ लाख कार्यकर्ते या दौऱ्यास सहभागी होतील असा दावा करण्यात आला आहे. दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. देवेंद्र फडणवीस अचानक अयोध्या दौऱ्याला निघाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांच्यासोबत भाजपचे सर्वच मंत्री असणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन दिवसापर्यंत अयोध्येचा दौरा केवळ शिवसेनेचा असल्याचं सांगितले जात होते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानाने आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येला गेले.
त्यांच्यासोबत भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन होते. तसेच भाजप नेते मोहित कंबोज आणि आमदार संजय कुटेही होते. तोपर्यंतही देवेंद्र फडणवीस या दौऱ्याला येणार असल्याची कुठलीच माहिती नव्हती. मात्र, एकनाथ शिंदे हे लखनऊ विमानतळावर आल्यावर त्यांनी नवी माहिती दिली. देवेंद्र फडणवीस हे भाजप मंत्र्यांसोबत अयोध्येला जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच थोड्यावेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरून अयोध्येकडे जाण्यासाठी निघाले आहेत. अचानक फडणवीस यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अयोध्या आणि लखनऊमध्ये या दौऱ्याची वातावरण निर्मिती करण्यात शिंदे यशस्वी झाल्यानेच भाजपनेही या दौऱ्यात सहभागी होत असल्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.