राहुल गांधींवरही टीका
मुंबई Mumbai . काँग्रेसनेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi ) यांच्याकडून मोदी – अदानी संबंधांचा धागा जोडत टीकेची झोळ उठविली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) यांनी मात्र काँग्रेसच्या भूमिकेसोबत एकप्रकारे फारकत घेत उद्योगपती गौतम अदानी (Industrialist Gautam Adani ) यांची पाठराखण केली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदाणी यांचा फोटो ट्विट करत टीका केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटच्या माध्यमातूनच लांबा यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. या ट्विटमधून त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीसुद्धा ईव्हीएमबाबत वेगळी भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात कौतुकास्पद वक्तव्यही केले. राष्ट्रवादीच्या या वाटचालीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
आम्ही हिंडेनबर्ग कंपनीचे कधी नावही ऐकले नव्हते. त्या कंपनीच्या अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या नियुक्तीची आवश्यकता नाही. एका परदेशी कंपनीच्या अहवालाने देशात खळबळ उडाली. अशाप्रकारची वक्तव्ये यापूर्वीही काही लोकांनी केली होती, याकडे शरद पवार यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून लक्ष वेधले होते. यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदाणी यांचा फोटो ट्विट केला. त्यावर भित्रे, स्वार्थी लोक स्वत:च्या हितासाठी हुकूमशाही सत्ताधीशांचे गुणगान गात आहेत. पण, राहुल गांधी एकटे देशातील जनतेसाठी लढाई लढत आहेत. तसेच, भांडवलदार चोर आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही, असे कॅप्शन या फोटोला दिले गेले आहे. याच ट्विटवरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांचा ३५ वर्षातील मित्रपक्ष आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री असणाऱ्यांबद्दल केलेले ट्विट आश्चर्यकारक आहे. भारतातील राजकीय संस्कृतीत राहुल गांधी घाणेरडे राजकारण करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.