Home Artical Blog विदर्भ साहित्य संघाची साहित्यबाह्य पण्य निवडणूक

विदर्भ साहित्य संघाची साहित्यबाह्य पण्य निवडणूक

0

 

७६ वर्षीय म्हातारपणामुळे, आता माझ्या झोपेची वेळ वाढलेली आहे; आणि झोपेची वेळ वाढल्यामुळे स्वप्नेही Repeat व्हायला लागली आहेत.
या अशा अफलातून प्रकारालाच म्हातारचळ म्हणत असावेत.
म्हणोत बापडे!
परवा कहर झाला : दोन स्वप्नांच्या मध्ये, ”संस्था सांभाळणे हे बाबुगिरीचे काम नाही. आम्हा थोर सारस्वताचे काम आहे” आणि ”संस्था सांभाळणे हे साहित्यिकांचे काम नाही” अशा आशयाच्या उलटसुलट हिंसक जाहिराती स्वप्नात यायला सुरवात झाली होती!
अहो, हे तर काहीच नाही!
काल रात्री (महा)कहर(च) झाला : दोन स्वप्नांच्या मध्ये, नागपूरस्थित विदर्भ साहित्य संघाच्या सद्य:कालीन पण्य इमारतीच्या पानिपती आवारात उभारलेले तीन वाताहती शामियाने दिसले.
मी त्या स्वप्नातच एका रिक्षावाल्याकडे (चांभार)चौकशी केली.
त्या रिक्षावाल्याने शामियान्यांकडे पाहिले व मग (लंब)कर्णनिर्देश केला.
मीही माझे कान टवकारले (अर्थात, स्वप्नात).
एका रंगिल्या शामियानातून, टाळ्यांच्या पार्श्वभूमीवर नूपुरांचा वांझोटा आवाज येत होता.
दुसऱ्या झालरी शामियानातून, ढोलकीच्या तालावर ‘जेस्ट जेस्ट’ असा गंगाजमनी थाटाचा आवाज आणि ‘ये नहीं चलेगा’ ही बोंबाबोंब एकाच वेळी कानांवर येत होती.
तृतीय (तृतीयपंथी नव्हे) शामियान्यातून, उच्चस्तरीय माजघरी गुप्त मसलतीच्या आवाजासह ‘खुळखुळ’ असाही आवाज येत होता….
पुढचे मला माहीत नाही. स्वप्न भंगले : माझी झोपमोड झाली.
वि. सा. संघाच्या निवडणुकीच्या संदर्भातील आमिषदार बातम्या ऐकून व वाचून आणि आता हे दु:स्वप्न पाहून, विद्यार्थिदशेत वि. सा. सं.चा कर्मचारी असलेला मी गुर्जर इतका आणि असा भयभीत व घामाघूम झालो होतो की, झोपमोड होताच मला बाथरूममध्ये पळावे लागले!
संभाव्य संकटाच्या नुसत्या जाणिवेनेही अधोवस्त्र ओले होते, असे जे म्हणतात ते काही अगदीच खोटे नाही!!
ता. क. :
आता हे ताजे स्वप्न : मतदार असलेला व काहीबाही लिहून स्वनामधन्य ठरलेला एक लाळघोटू, कृतघ्न व कळपी लेखकू काल रात्री माझ्या स्वप्नात आला. आपली छाती फुगवून व नकटे नाक फेंदारून, त्याने माझ्या डाव्या कानात जे सांगितले, त्यावर माझा विश्वास नाही :
“आम्ही निवडून आलो, तर तुला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनवू”, असे आमिषी आश्वासन म्हणे एका उमेदवाराने या नागपुरी लेखकूला दिले आहे.
पण, यावरही माझा विश्वास नाही!
पण, ‘Strange,but truth’ हे तत्त्व वि. सा. संघाच्या या निवडणुकीने नाना प्रकारांनी घनघोरपणे अधोरेखित झालेले आहे; त्यामुळे आता, अविश्वसनीय वाटणाऱ्या भंपक कुजबुजीवरही नाइलाजाने विश्वास ठेवावा लागतो.

(भास्कर नंदनवार)
9822568532)