
सामाजिक योगदान आणि मराठी संस्कृतीच्या प्रचार-प्रसार कार्याचा गौरव
नागपूर (NAGPUR), 8 मे 2025
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांचा सॅनफ्रान्सिस्को येथे स्टेट ऑफ कॅलिफोर्निया, द काऊंटी ऑफ सॅंटा क्लारा ह्यूमन रिलेशन कमिशन यांच्यातर्फे ‘आउटस्टँडिंग इन्वॅल्युएबल सर्विस’ हे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मागील सहा वर्षांपासून सॅनफ्रान्सिस्को येथे रेस्टॉरंट चालवत असलेल्या विष्णू मनोहर यांनी दिलेल्या सामाजिक योगदानासाठी त्यांना कमिशनचे आयुक्त नरेंद्र पाठक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कोविड काळात, होमलेस कॅम्पमध्ये जेवणाची व्यवस्था करणे, सुमारे 1200 मोफत लंच बॉक्सची 42 दिवस व्यवस्था करणे, प्रार्थना स्थळी प्रसादाची व्यवस्था आदी लोकसेवा, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या त्यांच्या कार्याची दखल घेत द काऊंटी ऑफ सॅंटा क्लारा ह्यूमन रिलेशन कमिशनने त्यांना सन्मानित केले आहे.
त्याचबरोबर, इतिहासात पहिल्यांदा हॅरिसन सिटी काउंटीमध्ये कलेक्टर अॅनेते रॅमिरेज यांच्या शपथग्रहण समारंभाला विष्णू मनोहर यांच्यामुळे मराठी शाकाहारी जेवण श्रीखंड, पुरी, मसालेभात, बटाटे वडा या पदार्थांना मानाचे स्थान देण्यात आले असून आता महिन्यातून एकदा काउंटीमध्ये मराठी पदार्थ दिले जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे.
विष्णू मनोहर म्हणाले, ‘मला आज खूप आनंद झाला आहे. परदेशातील लोकांमध्ये मराठी खाद्यसंस्कृतीची प्रचार व प्रसार करण्यासोबतच तेथील लोकांना वेळोवेळी मदत केली. या कार्याचा हा सन्मान असून याचे संपूर्ण श्रेय विष्णुजी की रसोईची युएसए टीम आणि तुषार कोठळकर, नरेश कुमार, समीर पाटील, हेमंत कुलकर्णी, विनोद पाताडे यांना देतो.’