बुलढाणा- जिल्ह्यातील जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात आलेल्या पुरामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. शेती खरडून गेली तर घर दार वाहून गेले. जनावरे चाऱ्याविना उपाशी आहेत तर माणसं अन्नविना आहेत या परिस्थितीमध्ये असलेल्या जिल्हा वासियांना मदतीचा हात देण्यासाठी बुलढाणा येथील ‘आम्ही बुलढाणेकर’ सरसावले असून मदतीची पाहिली खेप आज रवाना झाली आहे. आम्ही बुलढाणेकर ग्रुपने शहरात मदत फेरी काढून आणि सोशल मीडियाद्वारे आवाहन करून जळगाव जामोद आणि संग्रामपूर पूरग्रस्तांसाठी एक मदतीची मोहीम उघडली आणि या मोहिमेला लाखो रुपयांची प्रत्यक्ष आणि ऑनलाईन मदत मिळाली आहे. यातूनच आज जनावरांचा चारा घेवून एक ट्रक संग्रामपूरला बुलढाणा येथून रवाना झाला असून उद्या आणि परवा पुन्हा मदतीची किट घेवून टीम रवाना होणार आहे. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बगाजी सागर धरणाचे 25 दरवाजे उघडले
अमरावती – बगाजी सागर धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बगाजी सागर धरण सध्या 68 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणाचे 31 पैकी 25 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. यातून 668 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वर्धा नदी पात्रात मोठा पाण्याचा विसर्ग होत आहे. वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांचा नाल्यातून प्रवास , पुलाची मागणी
अमरावती – नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे. आता अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड शेतशिवारात जीव धोक्यात घालून शेतकरी नाल्यातून प्रवास करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खारवगळ नाल्यावरून पुलाची मागणी अपूर्णच असून या नाल्याला पूर आल्यास अनेकवेळा मजूर शेतात अडकल्याचेही प्रकार झाले आहेत. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.