अंतिम मतदार यादी कधी येणार ?

0

 

नागपूर  NAGPUR : भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक 23 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. याच दिवशी राजकीय पक्षाची सभा व पत्रकार परिषद घेऊन मतदार यादी संदर्भात माहिती देण्यात येणार असल्याचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा सुधारित संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्याचा दिनांक 22 जानेवारी 2024 असा होता. तथापि महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 19 जानेवारी 2024 च्या अधिसूचनेनुसार सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक 19 जानेवारी 2024 च्या पत्रानव्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, नागपूर जिल्हास्तरावरील विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणी विषयक तसेच निवडणूक विषयक जनजागृती करण्याकरिता सिव्हील लाईन येथील डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात ‘फरक पडतो’ या पथनाट्य स्पर्धेचे आयोजन दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.