बुलढाणा – कुरीअर सर्व्हीसचे पैसे घेवून जाणाऱ्या कर्मचाऱ्याची ट्रॅव्हल्समधून ६० लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅव्हल्स एका ढाब्यावर थांबली असता कारमधून आलेल्या चोरट्यांनी सिनेस्टाईल ही बॅग लंपास करुन पोबारा केला. मुंबई येथील एका कंपनीच्या अकोला शाखेचे मॅनेजर विक्रमसिंह स्वरुपसिंह मांगलीयार यांच्या हाताखाली कुरीअर सर्व्हीसचे काम करणारे प्रमोदसिंह मोहनसिंह परमार (३०) रा. राजस्थान ह.मु. अकोला हे काल रात्री एका ट्रॅव्हल्सने अकोलावरुन ६० लाख रुपये घेवून मुंबईला निघाले होते.
दरम्यान सदर ट्रॅव्हल्स वडनेर भोलजी गावानजीक हॉटेल विश्वगंगा समोर थांबली होती. त्यांनी पैशांची बॅग सिटवरच ठेवलेली होती. यावेळी एका कारमधून काही चोरटे आले व त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये जावून बॅग घेतली व काही क्षणात सिनेस्टाईल कारने बॅग घेवून ते पसार झाले. काही अंतरावर जावून या चोरट्यांनी बॅगमधून पैसे काढून घेतले व जिपीएस मशीन व खाली बॅग फेकून दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना ही सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी प्रमोदसिंह परमार यांच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द कलम ३७९ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. तात्काळ नांदुरा पोलिसांनी पथके शोध मोहिमेसाठी रवाना केली आहेत.