सुनील केदारांना जामीन मिळणार काय?

0

(Nagpur)नागपूर -काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून जामिनासाठी अर्ज सादर करण्यात शिक्षेनंतर विलंब झाल्यामुळे त्यादिवशी अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्या आल्यात. त्यामुळे मंगळवार २६ डिसेंबरला सत्र न्यायालयाचे न्यायामूर्ती आर.एस. भोसले (पाटील) यांच्या न्यायालयापुढे केदार यांच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे.

आता न्यायालय या अर्जावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने 5 वर्षे शिक्षा सुनावलेले (Sunil Kedar)सुनील केदार यांच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये उपचार सुरु आहेत. रविवारी केदार यांचा एमआरआयचा अहवाल नॉर्मल आला. परंतु क्रिएटीनीन वाढल्याने त्यांची ‘सीटी अ‍ँजिओग्राफी’ पुढे ढकलण्यात आली. आता मंगळवारला पुन्हा त्यांची तपासणी करण्यात येईल. ती सामान्य आल्यावरच त्यांची अ‍ँजिओग्राफी करुन, त्यांना मेडिकलमधून सुटी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शेतकरी व सामान्य जनतेची बँक म्हणून ओळख असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (एनडीसीसी) रोखे घोटाळ्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारला केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षाच्या कारावासाची,12.50 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठविली आहे. शिक्षा सुनाविल्यानंतर केदार यांना वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये आणण्यात आले. तेथे त्यांना घशात संसर्ग, मायग्रेनचा त्रास आणि ईसीजीमध्ये ‘हार्ट रेट’ कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना तातडीने मेडिकलच्या वार्ड क्र. ५२ या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. मंगळवारला पुन्हा एकदा त्यांची ईसीजी तपासणीही करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.