मुंबई – एकिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar on Kharghar tragedy) हे आमदारांसह भाजपसोबत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरु असतानाच अजित पवारांनी आज खारघर दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारवर तोप डागली. राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अजित पवारांनी ही मागणी केली आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित असून या घटनेला सर्वस्वी सरकारच जबाबदार असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपये बाधित नागरिकांना उपचारांसह प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अजित पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, “खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावे.”
“घटनेच्या दिवशीच मी स्वतः नवी मुंबईतील एम.जी. एम. रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि डॉक्टरांची भेट घेतली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस आहे. उष्णतेची प्रचंड मोठी लाट आलेली आहे. डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी महाराष्ट्रात आहेत. साहजिकच अशा प्रकारच्या सोहळ्याला लाखो अनुयायी उपस्थित राहतील, ही धारणा लक्षात घेणे गरजेचे होते. एवढा मोठा कार्यक्रम, मोकळ्या मैदानावर, दुपारच्या वेळी आयोजित करून निष्पाप अनुयायांच्या जीवाशी खेळण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाले आहे, अशी भावना आज सर्वसामान्यांची झाली आहे. उष्णतेची मोठी लाट आलेली असताना बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित करून आणि त्याचे थेट प्रक्षेपण करूनही दुर्घटना टाळता आली असती. मात्र काही तरी भव्यदिव्य करून दाखवण्याच्या अट्टाहासापायी निष्पाप अनुयायांना वेठीस धरले गेले आणि त्यात १३ अनुयायांचा बळी गेला. शासनाच्या नियोजन शून्य आयोजनामुळे निष्पाप अनुयायांचा बळी गेला आहे. या घटनेला आणि मृत्यूना पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे”, असेही पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.