“राष्ट्रवादीतच राहणार, अ‍ॅफिडेव्हिटवर लिहून देऊ का?…”: अजित पवार

0

मुंबईः आपण राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेत कुठलेही तथ्य नसल्याचे स्पष्टपणे सांगत अजित पवार यांनी प्रसार माध्यमांवर नाराजी व्यक्त (Clarification from NCP Leader Ajit Pawar) केली. “मी राष्ट्रवादीतच आहे व राहणार, हे आता अॅफिडेव्हीटवर लिहून देऊ का?..” या शब्दात त्यांनी राजकीय चर्चांना आज पूर्णविराम दिला. प्रथमच आपली राजकीय भूमिका सविस्तरपणे मांडताना माझ्याबद्दल वाट्टेल ते गैरसमज पसरवू नका, असा सल्लाही त्यांनी प्रसार माध्यमांना दिला. माझ्याकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असून मी कुठलीही बैठक बोलावली नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत. कोणी काय मत व्यक्त करावे, हा त्या-त्या राजकीय पक्षाचा अधिकार आहे. आमदार मंत्रालयात कामासाठी येतात. आमदार नेहमीच्या पद्धतीने भेटायला येत आहेत. त्यात वेगळा अर्थ काढू नका, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, “शरद पवारांच्या मार्गदर्शन, नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. आजवर अनेक चढउतार आले. मात्र, बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. महत्त्वाचे प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न होत आहे. बेकारी, अवकाळी पाऊस, महागाई, नोकर भरती असे अनेक प्रश्न आहेत. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक जण उष्माघाताने दगावले, अनेकांवर उपचार सुरू होते. मी त्या सर्वांची भेट घेतली. मोठ्या प्रमाणावर श्रीसदस्य आले, आदल्या दिवशीही अनेक जण आलेले आपल्याला दिसले असतील. यात आम्हाला कुठल्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर 13-14 कोटी रुपये खर्च केला जातो. मग एवढा खर्च केला तर मंडप टाकायला काय अडचण होती? याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे”, असे अजित पवार म्हणाले.
प्रसार माध्यमांना उद्देशून अजित पवार म्हणाले, “तुम्ही दाखवत असलेल्या बातम्यांमध्ये यत्किंचितही तथ्य नाही. वज्रमूठ जाहीरसभेत प्रत्येक पक्षाचे दोन जण बोलतील, असे महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये ठरले होते. झालेल्या सभांमध्ये जे लोक बोलले त्यांची बातमी नाही, आणि अजित पवार का बोलले नाहीत याची बातमी होते, हे बरोबर नाही. अजित पवार राष्ट्रवादीतच राहणार हे अ‍ॅफिडेव्हिटवर लिहून देऊ का?” असा सवालही त्यांनी केला. “आता या गोष्टींना पूर्णविराम द्या. आम्ही सर्व परिवार म्हणून काम करत आहोत. जो काही संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे, त्यात आमचीही सहनशीलता कधी-कधी संपते. आमच्या सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका”, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.