नागपूर – महानगरपालिकेद्वारे सक्करदरा येथील बुधवार बाजार परिसरातील प्रसाधनगृहाचा कायापालट करून तिथे स्मार्ट स्वच्छतागृह साकारण्यात आले आहे. हनुमान नगर झोन अंतर्गत बुधवार बाजारातील या ‘स्मार्ट स्वच्छतागृहाचे’ मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि स्थानिक सफाई कर्मचा-याच्या हस्ते लोकार्पण झाले.
याप्रसंगी हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, कार्यकारी अभियंता (स्लम) कमलेश चव्हाण, नागपूर@२०२५ चे प्रमुख शिवकुमार राव देवेन्द्र भोवते आदी उपस्थित होते. याठिकाणी स्तनदा मातांसाठी वातानुकूलित हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी व्हिल चेअर, महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, हँड ड्रायर अशा अनेक सुविधांनी सज्ज असे ‘स्मार्ट स्वच्छतागृह’ आहे. या स्वच्छतागृहाला सेन्सरवर आधारित स्मार्ट प्रवेशद्वार असून ते उघडण्याची वा बंद करण्याची गरज नाही. स्वच्छतागृहामधील सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनमध्ये ५ रुपयांचे नाणे टाकून एक पॅड मिळविता येते.
पुरूषांच्या स्वच्छतागृहामध्ये चार मुतारी, कमोड व साधे शौचालय आणि बाथरूम आहे. दिव्यांगांकरिता स्वतंत्र कमोड शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगांकरिता स्वच्छतागृहामध्ये व्हिल चेअरची व्यवस्था आहे. प्रवेशद्वारावर झाडे लावण्यात आली आहेत.
नागपूर शहरामध्ये एकूण चार स्मार्ट स्वच्छतागृह तयार करण्यात येत आहेत. यापैकी गोकुळपेठ आणि बुधवार बाजार येथील स्वच्छतागृह नागरिकांच्या सुविधेसाठी खुले करण्यात आले आहे. तर सुगतनगर आणि कळमना येथील स्वच्छतागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, गोकुळपेठ, बुधवार बाजार आणि सुगतनगर येथील स्वच्छतागृहांचा कायापालट करून येथे स्मार्ट स्वच्छतागृह तयार करण्यात येत आहेत. तर कळमना येथे पूर्णत: नवीन बांधकाम करून स्मार्ट स्वच्छतागृह साकारण्यात येणार आहे. या चारही स्वच्छतागृहांकरिता १.५ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे.
नागपूर शहरामध्ये आणखी स्मार्ट स्वच्छतागृहांची निर्मिती व्हावी याकरिता मनपाद्वारे शासनाला सात स्मार्ट स्वच्छता गृहांचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) पाठविण्यात आलेला आहे. सात ठिकाणी तयार होणा-या स्मार्ट स्वच्छतागृहांमध्ये एकूण ८४ शौचालय, २५ बाथरूम, ७९ मुतारी, ७ हिरकणी कक्ष, ७ देखरेख कर्मचारी खोल्या आणि १४ दुकाने प्रस्तावित आहेत. फुटाळा, मानकापूर, मंगळवारी बाजार, रहाटे कॉलनी चौकातील गोरक्षण सभा जवळ, पारडी दहन घाटाजवळ, गांधीबाग कपडा बाजार आणि सतरंजीपुरा येथील मनपाचे जुने कार्यालय या सात ठिकाणच्या प्रस्तावित स्मार्ट स्वच्छतागृहांकरिता ५९९.०७ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चातील २५ टक्के म्हणजे १४९.७७ लक्ष रुपये केंद्र सरकार, ३५ टक्के अर्थात २०९.६८ लक्ष रुपये राज्य सरकार आणि उर्वरित ४० टक्के म्हणजेच २३९.६२ लक्ष रुपये मनपा खर्च करणार आहे.