राष्ट्रवादीतील दोन गटांमध्ये आता कारवाई आणि नियुक्त्यांचं सत्र

0

 

मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गटांमध्ये आता कारवाई आणि नव्या नियुक्तांचा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर कारवाई सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पदावरून हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी खासदार सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही पटेलांनी यावेळी दिली.
तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल तसेच खासदार सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत पटेल आणि तटकरे यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. त्यानंतर पक्षाकडून कारवाईचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान , मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांना
शरद पवार यांच्या गटाकडून करणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असल्याने आता त्यांच्याविरुद्ध देखील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे मानले जात आहे.