मुंबई: पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फची कारवाई केली आहे. काल शपथ घेतलेल्या नऊ आमदारांवर पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला असून त्यांच्यावर देखील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहून पक्षविरोधी काम करणारे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांची खासदारकी पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. सुळे यांनी यासंबंधी शरद पवारांना एक पत्र लिहिले होते.
खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या अध्यक्षांना अंधारात ठेऊन शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि पक्षविरोधी कारवायात सहभाग नोंदवला, असा आरोप खा. सुळे यांनी केला आहे. दहाव्या अनुसूचीतील तरतुदीनुसार पक्षांतरबंदी कायद्याखाली या दोघांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे. या दोन्ही खासदारांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडत पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी आणि पक्षाच्या 9 आमदारांनी पक्षाची कोणतीही संमती न घेता परस्पर निर्णय घेतला आहे, त्यामुळे कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुळे यांनी केली आहे.