एक वृक्ष आणि एक रानवेल

0

 

 

सह्याद्रीच्या कुशीतील भटकंतीत पर्वतावर एक खूप जुने; पण परिचित असे झाड भेटले. एरवी ते बहरलेले असायचे. आता त्याचा साज, सौंदर्य, कांती सारे काही लुप्त झाले होते. आजोबांप्रमाणे ते वयोवृध्द झाले आहे. हे सारे असूनही आभाळात विहार करण्याची त्याची जिद्द ओसरलेली नव्हती. अंगावर पाने, फुले, फळेच काय साधी काष्ट त्वचाही उरलेली नसताना अरण्यात खड्या तपश्चर्येला अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या हटयोग्याप्रमाणे ते दिसत होते. तेजःपुंज सूर्यासमोर ते धाडसाने ठामपणे उभे असते. “ही माझी शेवटची घटिका असली तरीही मी मुक्त जगेन आणि या आभाळाला कवेत घेईन. मी मोडेन; पण वाकणार नाही,”असे ते हिमतीने सूर्याला सांगत होते. शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने, निश्चयाने जगण्याचा त्याचा निर्धार पाहून मी थक्क झालो.

 

भटकंतीच्या पुढच्या टप्प्यात डोंगर धार उतरून जंगलात आलो तिथे आधीच्या निष्पर्ण वृक्षाच्या अगदी विरोधी अवस्थेत असलेला वेल दिसला. त्याला पाने, फुले, कळ्या, नवे अंकुर असे सारे काही होते. पानांच्या पर्णरेषा स्पष्ट दिसत होत्या. निळ्या आभाळाने धरतीकडून पाचुरुपी दागिना घ्यावा आणि गळ्यात अडकवून मिरवावा रानभर तसे ते दृश्य होते. या वेलीला लगडलेली तांबडी फुले मौल्यवान माणिक चमकावा तशी दिसत होती. हा वेलदेखील तप्त उन्हात उभा होता. त्याचा कोवळा अंकुर सूर्याच्या दिशेने प्रवास करीत होता. निसर्गातील हे कोवळे सौंदर्य थेट सूर्याला आव्हान देते तरी कसे? याचे मला आश्चर्य वाटले. कदाचित या रानवेलाच्या अंगी असलेले पावित्र्य, निष्पाप वृत्ती, दातृत्व आणि निसर्ग धर्माचा निरपेक्ष अंगिकार याचा हा प्रभाव होता.

 

जंगलातील या प्रज्ञावंत रानवेलीचे मनोभावे दर्शन घेतले आणि भटकंतीची पुढची वाट मी चालू लागलो..!

 

✒️ मनोज कापडे

सह्याद्री पर्वतरांगा, पुणे.

९८८११३१०५९

🏞️🌞🦚🕊️🕊️🕊️