मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असताना या चर्चेला पुष्टी देणारी वक्तव्ये आता त्यांच्या समर्थक आमदारांकडून सुरु झाली आहेत. अजित पवार घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे नमूद करताना अजित पवारांसोबत ४० पेक्षा अधिक आमदार असू शकतील, असा दावा त्यांचे कट्टर समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांनी केलाय. आपण लवकरच मुंबई अजित पवार यांची भेट घेणार असून त्याचवेळी त्यांच्यासोबत किती आमदार आहेत, हे स्पष्ट होणार असल्याचे सूचक विधानही आमदार बनसोडे यांनी केले आहे. तर दुसरीकडे सुरगण्याचे आमदार नितीन पवार यांनीही अजित पवारांचा निर्णय आम्हाला मान्य राहील, असे सांगितले.
अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांच्या सांगण्यानुसार, राष्ट्रवादीचे बरेचशे आमदार मुंबईतच आहेत. अजित पवार यांनी यासंदर्भात कुठलीही बैठक बोलावलेली नाही. आम्हीच त्यांना भेटण्यासाठी मुंबईत आहोत. मी दादांना मानणारा कार्यकर्ता असून त्यांच्यावर आपली श्रद्धा असल्याचे आमदार बनसोडे म्हणाले. तर विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षासोबत जाणे महत्वाचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार केली केले आहे. पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळीच माघार घ्यायला नको होती, असेही नितीन पवार म्हणाले.