
संस्कार भारती दृश्यकला विभाग व मातृशक्तीचे महिला दिना निमित्त आयोजन
नवजीवन घडवण्याची निसर्गदत्त देणगी केवळ स्त्रीला लाभलेली आहे. आज आर्थिक स्थैर्य मिळवून स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने करिअरला प्राधान्य देत असतानाच विवाहाचे वाढलेले वय, त्यानंतर वाढत्या वयात गर्भधारणेत येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे जन्माला येणाऱ्या नव्या पिढीत उत्पन्न होणारे दोष यावर गंभीरतेने विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. विशेषतः जेन झी म्हटल्या जाणाऱ्या आजच्या तरुण मुलींचे या दृष्टीने वैचारिक सशक्तीकरण (एम्पॉवरमेंट ऑफ थॉट्स) करणे अतिशय गरजेचे आहे असे आवाहन संस्कार भारती नागपूरच्या कार्याध्यक्ष डॉ. मृणालिनी दस्तुरे यांनी केले. नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्कार भारतीच्या मातृशक्ती आणि रांगोळी विधेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नव्या पिढीतील विवाहेच्छुक मुली आणि त्यांच्या पालकांना वर्तमानातील सामाजिक आणि कौटुंबिक आव्हानांची जाणीव करून देताना त्या बोलत होत्या.

याविषयी विस्तृत माहिती देताना त्यांपुढे म्हणाल्या की शास्त्रीय निरीक्षणांमधून असे लक्षात आले आहे की वाढत्या वयात होणाऱ्या विवाहांमुळे कृत्रिम गर्भधारणेतून होणारे जन्म वाढले आहेत. आणि अशा गर्भधारणेतून जन्माला येणाऱ्या नव्या पिढीत बौद्धिक अक्षमता, अध्ययन अक्षमता (उदा. डिस्लेक्सिया) आणि वर्तणूक दोष (उदा. ऑटिझम, ADHD) अशा प्रकारचे विकार उद्भवण्याची शक्यता जास्त असते. ज्या करिअरसाठी लग्नाचा निर्णय लांबणीवर टाकला जातो, तेच करिअर, मुलाला असा विकार असल्यास पालकांना (विशेषतः मातांना) कायमचे सोडावे लागते. या परिस्थितीमुळे मुले आणि पालक दोघांनाही प्रचंड मानसिक आणि भावनिक तणावाचा सामना करावा लागतो.
येत्या 10 वर्षात शाळांमधील अशा मुलांचे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या 20 टक्के असेल असे एका सर्वेक्षणातून मांडले गेले आहे. शाळांमधून मधून असे दोष असणाऱ्या मुलांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार पुरेसे नसून, याबाबतीत आपला प्राधान्यक्रम बदलणे गरजेचे आहे. म्हणूनच एका स्त्रीसाठी केवळ आर्थिक प्रगती हाच यशाचा मापदंड असू नये, तर सुदृढ असलेल्या नव्या पिढीला जन्म देणे हेही महत्वाचे आहे हा विचार आजच्या तरुण महिलांमध्ये रुजावा, ही काळाची गरज आहे असे कळकळीचे प्रतिपादन त्यांनी केले.

रांगोळीच्या रंगरेषां मध्ये समाजमन घडविण्याची ताकद : आशुतोष अडोणी
याच कार्यक्रमात खासदार महोत्सवात रांगोळ्या काढणाऱ्या सहभागी रांगोळी कलाकारांचा सत्कार संस्कार भारतीच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भाजपचे नागपूर शहर कोषाध्यक्ष राजेश बागडी यांनी समर्पित वृत्तीने भूअलंकरण करणाऱ्या रांगोळी कलाकारांचे कौतुक केले. यानिमित्ताने रांगोळी कलाकारांना संबोधित करताना संस्कार भारतीचे अ. भा. मंत्री आशुतोष अडोणी म्हणाले की रांगोळीचे मूल्य केवळ एका कणाचे असले तरी त्या रांगोळीच्या कणांमधून जोडल्या जाणारे बिंदू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रंगरेषाची कलाकृती यात समाजमन घडविण्याची ताकद आहे. रांगोळी एक जीवनाचे दर्शन आहे, एक जीवनदृष्टी आहे. रांगोळी काढणारे केवळ कलाकार नसून हे आत्मविलोपी वृत्तीने कार्य करणारे भू अलंकरण कलासाधक आहेत. आणि आपल्या कलेत असणाऱ्या या क्षमतेचा, जीवनदृष्टीचा आणि साधनेचा हा सन्मान आहे.
व्यासपीठावर भाजपचे नागपूर शहर कोषाध्यक्ष राजेश बागडी, संस्कार भारतीचे अ. भा. मंत्री आशुतोष अडोणी, संस्कार भारतीचे प्रांत सहमंत्री गजानन रानडे, नागपूर अध्यक्ष वीरेंद्र चांडक, कार्याध्यक्ष डॉ. मृणालिनी दस्तुरे, मंत्री मुकुल मुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुल मुळे यांनी केले. सूत्रसंचालन दिपाली हरदास यांनी तर आभार प्रदर्शन राधा कावडे यांनी केले. रांगोळी मोहिनी माकोडे यांनी काढली. कार्यक्रमाला रांगोळी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
मा. संपादक / वार्ताहर,
कृपया वरील वृत्ताला आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी द्यावी.
प्रसाद पोफळी
प्रसिद्धी प्रमुख
संस्कार भारती, नागपूर
9822569648














