(Akola)अकोला: वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश व्हावा, यासाठी (Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून आश्वासन मिळूनही अद्याप तसे घडलेले नाही. त्यामुळे आता (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा इशाराच आंबेडकरांनी दिलाय. लवकर निर्णय न झाल्यास आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत, असे आंबेडकरांनी अकोल्यात बोलताना स्पष्टच सांगितले. वंचित बहुजन आघाडीची सध्या भारत राष्ट्रीय समितीसोबतही (बीआरएस) संभाव्य तिसऱ्या आघाडीसाठी चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल (CONGRESS)काँग्रेस आणि (NCP) राष्ट्रवादीशी काय चर्चा झाली, हे उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांत स्पष्ट करावे, अशी मागणी करून आंबेडकर म्हणाले की, आता निवडणुका जवळ आल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही, असेही ते म्हणाले. अजित पवार यांनी काल भाषणात केलेल्या गौप्यस्फोटांवर बोलताना आंबेडकर यांनी अजित पवार हे जे ओठात तेच पोटात असणारे नेते असल्याचे सांगितले.