Home Artical Blog राजकारणालाही लाजवणारी, साहित्य क्षेत्रातली निवडणूक!

राजकारणालाही लाजवणारी, साहित्य क्षेत्रातली निवडणूक!

0

मतपत्रिकांची पळवापळव,                                                                            मृतकाच्या नावे मतदान!

नागपूर(Nagpur):
समाजात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या साहित्य जगतातील मतदारांद्वारे होत असलेली विदर्भ साहित्य संघाची यंदाची निवडणूक राजकारणालाही लाजवणारी ठरते आहे. मतपत्रिकांची पळवा पळव काय, मृतकांच्या नावे मतदान काय, पोस्टाने पाठविण्यात आलेल्या मतपत्रिकांचा घोळ काय, सारेच अजब आणि लाजिरवाणे ठरावे असेच आहे. आणि सध्या हे लाजिरवाणी चित्र विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत विदर्भात जवळपास सर्वदूर बघायला मिळते आहे.
खरं तर विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची आणि त्यातील मतदानाची फारशी सवय मतदारांना नाही. कारण आजवरच्या, म्हणजे गेल्या निदान दोन दशकातल्या निवडणुकी मतं मॅनेज करूनच झाल्या आहेत. साहित्य संघाच्या घटनेनुसार या मतपत्रिका तांत्रिकदृष्ट्या लोकांच्या नावे रवाना करायच्या, प्रत्यक्षात त्या मतपत्रिका थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून किंवा मग मतदारांकडून आपल्या ताब्यात घ्यायच्या आणि आपल्याला हव्या असलेल्या नावांसमोर मतदान करून, आपल्याला हवे ते पदाधिकारी निवडून आणायचे, याच पद्धतीने आजवर शेवाळकर, द्वादशीवार, म्हैसाळकर आणि आताचे प्रदीप दाते निवडून आले आहेत. त्यामुळे मतदानाची सवयच न उरलेल्या मतदारांना, यंदा प्रत्यक्षात मतपत्रिका हाती पडल्या तेव्हा, अरेच्चा! आपण विदर्भ साहित्य संघाचे सदस्य आणि मतदार आहोत तर! अशी भावना मनात निर्माण झाली.
यंदा गिरीश गांधींची अध्यक्षपदासाठीची उमेदवारी आणि त्यांना जाहीरपणे लाभत असलेला एका राजकीय पक्षाचा पाठिंबा, यामुळे यंदाची निवडणूक चर्चेची आणि तितकीच वादग्रस्त ठरते आहे. जणू काय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा विधानसभा, लोकसभेची निवडणूक असल्यासारखी परिस्थिती यंदा या निवडणुकीत बघायला मिळते आहे. मतदारांच्या, समोर येत असलेल्या विविध तक्रारी बघितल्या, तर यंदाच्या निवडणुकीला लागलेली राजकीय किनार लागलीच स्पष्ट होते.
गो. नी. हडप हे विदर्भातील एक विख्यात नाव आहे. एकेकाळी कामगार संघटनांचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे. गो. नी. हडप यांनी दाखल केलेली एक तक्रार सध्या समाज माध्यमांवर फिरते आहे. स्वतः हडप यांनी देखील या तक्रारीची पुष्टी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठवलेली मतपत्रिका आपल्याला मिळाली नसल्याचे आणि प्रत्यक्षात आपल्या नावाने एका उमेदवारानेच मतदान केले असल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे. गडचिरोली(Gadchiroli) जिल्ह्यात एका मृतकाच्या नावाने मतदान झाल्याची बाब समोर आली आहे. तिथल्या नागरिकांनी तर सात मिनिटात अकरा घरी मतपत्रिका पोहोचून देण्याच्या पोस्ट खात्याच्या ‘अधिकृत विक्रमा’वरही टीका केली आहे. लोकांकडून जमा केलेल्या कोऱ्या मतपत्रिकांवर अध्यक्षपदाच्या एका उमेदवाराच्या कार्यालयात बसून तिथे मतदान केले जात असल्याचे आणि आधीच मतदान झालेअसेल आणि त्यातील मतदान आपल्या बाजुने नसेल, तर त्या मतपत्रिकेवर अधिकचे मतदान करून ती मतपत्रिकाच बाद ठरविण्यासाठी देखील या कार्यालयातून काम केले जात असल्याच्या बातम्या, आता केवळ प्रसार माध्यमातूनच नव्हे, तर वृत्तपत्रांमधूनही झळकू लागल्या आहेत. हे वृत्त खरे असेल तर, मतदारांची मतदान करून दिलेली मतपत्रिका निवडणूक अधिकाऱ्यांच्या आधी अन्य कुणी व्यक्ती उघडून बघत असल्याची वस्तुस्थिती उघड होते. हे नियमांच्या चौकटीत बसणारे आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो.
त्यातल्या त्यात गो. नी. हडप यांची तक्रार तर अधिकच गंभीर ठरली आहे. मतदाराच्या संमतीविना त्रयस्थ माणसाला त्याची मतपत्रिका देण्याचा प्रकार हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय निर्माण करणारा ठरला आहे. एकूणच, विदर्भ साहित्य संघाची यंदाची निवडणूक प्रत्यक्ष राजकीय सहभागातून होत असल्याचे स्पष्ट करणारी आणि साहित्य वर्तुळाला लाज आणणारी ठरते आहे, हे मात्र खरे!