हैदराबाद-कंपनीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात स्टंटच्या माध्यमातून स्टेजवर एंट्री घेण्याचे धाडस कंपनीच्या सीईओला भोवले. यात अपघात होऊन सीईओचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये घडली. या सीईओचे नाव संजय शहा असे होते. ते व्हिटेक्स आशिया पॅसिफीक कंपनीचे अमेरिकेतील सीईओ होते. या अपघातात कंपनीचे अध्यक्ष विश्वनाथ दातला गंंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
एका राष्ट्रीय दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे गुरुवारी रात्री व्हिस्टेक्स कंपनीचा रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर वेगळ्या पद्धतीने प्रवेश घेण्याचा स्टंट आयोजित करण्यात आला होता. सीईओ शहा आणि अध्यक्ष राजू दातला हे मुख्य मंचावर एका लोखंडी पिंजऱ्यातून वरून खाली येणार होते. यावेळी दोघेही पिंजऱ्यातून आपल्या कर्मचाऱ्यांना हात हलवून अभिवादन करत होते. पिंजरा हळूहळू खाली येत असताना पिंजऱ्याला जोडलेल्या दोन तारांपैकी एक तार तुटली आणि पिंजरा १५ फुटांपेक्षा अधिक उंचावरून मंचावर कोसळला.
पिंजरा कोसळल्यानंतर शहा आणि दातला हे दोघेही गंभीर जखमी झाले. ५६ वर्षीय संजय शहा आणि राजू दातला यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळातच शहा यांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली. ते घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले असण्याचा अंदाज आहे. तर राजू दातला हे अत्यावस्थ अवस्थेत आहेत. रामोजी फिल्म सिटीमधील इव्हेंट आयोजित करणाऱ्या कंपनीवर भारतीय दंड विधान कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे) आणि कलम ३३६ (मानवी जीवन धोक्यात टाकणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.