नागपूर NAGPUR : आगामी काळात स्थानिक स्वाराज्य संस्था, लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर BJP भाजपने संघटनात्मक बदल हाती घेतले असून निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ते केले जाणार आहेत. पक्षाने निवडणूक प्रभारी नेमल्यावर आता जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या सुरु केल्या आहेत. नागपूर शहर व नागपूर ग्रामीणच्या जबाबदाऱ्या नेमक्या कोणाला मिळणार? पदाधिकारी बदलणार की कायम राहणार? असे प्रश्न भाजपच्या वर्तुळात सुरु झाले आहेत.
नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद गजभिये आणि शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अलीकडेच या दोन्ही नेत्यांना रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडील अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या काढणार की कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर शहराचे अध्यक्ष प्रवीण दटके यांना बदलणार की कायम ठेवणार, असा प्रश्न विचारला जातोय. पक्षाने नागपूर ग्रामीणमधील सावनेर व काटोल विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने नागपूर ग्रामीणची जबाबदारी दिली जाणार असल्याची भाजपच्या वर्तुळात चर्चा आहे.
येत्या आठवडाभरात या नियुक्त्या होतील, असे संकेत भाजपमधून मिळत आहेत.