NCP राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे शक्तीप्रदर्शन सुरु, कोण किती पाण्यात, लवकरच कळणार

0

मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आज मुंबईत शरद पवार आणि अजित पवार Sharad Pawar and Ajit Pawar या दोन्ही गटांचे शक्तीप्रदर्शन सुरु असून यात कोणता गट वरचढ ठरणार, याचा निकाल लवकरच लागणार आहे. अजित पवार यांच्यासोबत ४० पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा या गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी केला असला तरी अनेक अजित पवार समर्थक आमदार शरद पवारांच्या तंबूत दिसू लागले असल्याने अद्याप तरी चित्र स्पष्ट झालेले नाही. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली शरद पवार यांच्या गटाची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये होत आहे. या दोन्ही ठिकाणी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी असून दोन्ही ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
या बैठकीत जास्तीत जास्त आमदारांना उपस्थित करण्यासाठी दोन्ही गटांकडून मोठा जोर लावला जात आहे. आमदारांना दोन्ही गटांकडून फोन जात आहे. अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा त्या गटाकडून सुरु असला तरी अजित पवारांचे काही समर्थक आमदार शरद पवारांच्या तंबूत दिसत आहेत. 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. तर दुसरीकडे विदर्भातील देवेंद्र भुयार तसेच शिरुरचे अशोक पवार, आमदार किरण लहामाटे, आमदार राजेंद्र शिंगणे हे वायबी सेंटरला शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित झाले आहेत.