Home LOCAL NEWS महाशिवरात्री कार्यक्रमस्थळी आमदार किशोर जोरगेवार यांची व्यवस्थेची पाहणी

महाशिवरात्री कार्यक्रमस्थळी आमदार किशोर जोरगेवार यांची व्यवस्थेची पाहणी

0

 

महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रातील सर्वात विशाल महाशिवलिंग स्थळी आयोजित करण्यात येणार्या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज कार्यक्रमस्थळी भेट देत सुरू असलेल्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मनपा अधिकारी, वेकोली प्रशासनातील अधिकारी आणि मंदिर कमेटीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी विविध समित्यांमार्फत अंतिम तयारी सुरू आहे. यावेळी आमदार जोरगेवार यांनी मंडप उभारणी, दर्शन रांग व्यवस्था, वाहतूक नियोजन, पार्किंग सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता व्यवस्था, प्रकाशयोजना तसेच सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.

१५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळपासून रुद्राभिषेक पूजा, महाआरती, शिव-पार्वती विवाह सोहळा, भजन संध्या व प्रसाद वितरण असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बाहेरगावाहून येणार्या भाविकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे तसेच सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये, याबाबत संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या. कार्यक्रम भक्तिभावाने, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केले.