बारावी प्रात्यक्षिक परीक्षेवर संस्थाचालकांचा बहिष्कार

0

नागपूर : राज्यात बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचे संकट घोंगावत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार घालत या परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सहकार्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ऐन परीक्षा तोंडावर आल्या असताना पालक आणि विद्यार्थी चिंताक्रांत झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एका वाहिनीशी बोलताना सांगितले की, आम्ही याबाबत सरकारला आधीच नोटीस दिली होती. मात्र, सरकारने अ्दयापही त्याची दखल घेतलेली नाही. नाक दाबल्यानंतरच तोंड उघडते. त्यामुळे आता आमच्यापुढे कुठलाच पर्याय राहिलेला नाही. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, थकीत वेतनेत्तर अनुदान आणि इतर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे मंडळाकडून दुर्लक्ष होत आहे. यासाठीच महामंडळाने बहिष्काराचे पाऊल टाकले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आमच्या या बहिष्कारात आमच्या शाळा आणि शाळेतील कर्मचारी प्रात्यक्षिक परीक्षांसाठी उपलब्ध करून देणार नाही, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने बऱ्याच अगोदर नोटीस देऊनही साधी चौकशी देखील केली नाही. सरकारने महामंडळाची बैठक घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतरच या मुद्यावर तोडगा निघू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थाचालकांच्या मागण्यांवर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. २०१२ पासून अजून पर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही. महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे (2004 ते 2013 पर्यंतचे) थकीत वेतनेत्तर अनुदान द्यावे, नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदीं बाबत माहिती देण्यात यावी, अशीही मागणी आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे तर दहाीची परीक्षा १ मार्चापासून सुरु होणार आहे.