खंडित वीजपुरवठ्याचं राजकारण खेळाडूंची तीव्र नाराजी!

0

 

चंद्रपूर  CHNDRAPUR : ज्याने संपूर्ण देशात नावलौकिक मिळविला. ज्या सुरेख आयोजनामुळे खेळाडूंनी मनोमन कौतुकाची थाप आयोजकांच्या पाठीवर दिली, त्या ६७व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाला जेमतेम पंधरवडाच लोटला असताना केवळ २ तासांच्या वीज तोडणीचे राजकारण करण्याच्या प्रकारावर खेळाडू तीव्र नाराज झाले आहेत.

खेळाडूंच्या समस्यांकडे ज्यांनी आजवर कधी लक्ष दिले नाही, असे लोक आता क्रीडा संकुलास सहकार्य करण्याचा आव आणत विसापूर येथील क्रीडा संकुलाच्या वीज विषयावर राजकारण करीत असल्याचा प्रकार अत्यंत दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया खेळाडूंनी व्यक्त केली आहे.

बल्लारपूर नजिकच्या विसापूर तालुका क्रीडा संकुलाचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तत्काळ हा वीज पुरवठा सुरळीतही करण्यात आला. अगदी काही तासांसाठी हा पुरवठा बंद होता. मात्र या प्रकाराचे काहींनी राजकारण सुरू केले. आंदोलन करीत त्यांना खेळाडूंची व जिल्ह्यातील योजनांची किती काळजी आहे याचा आव आणला गेला. विशेष म्हणजे आंदोलन करणाऱ्यांपैकी एकही जण शालेय राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा सुरू असताना क्रीडा संकुलाकडे फिरकलाही नाही किंवा त्यांनी खेळाडुंना कोणत्याही सुविधाही पुरविल्या नव्हत्या.

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धां या उत्तमरित्या उत्साहात पार पडल्या अशात केवळ काही तासांच्या खंडित वीज पुरवठ्याचा मुद्दा पुढे करीत राजकारण करणाऱ्यांनी आपली कोती मानसिकता दाखवून दिल्याचा संताप क्रीडापटू व्यक्त करीत आहेत. असे राजकारण करणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी खेळाडूंना आवश्यक सोईसुविधेकरीता पुढाकार घ्यावा असे आव्हानही क्रीडाप्रेमींनी केले आहे.

 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अविस्मरणीय आठवणींना गालबोट लावण्याचा नतद्रष्ट कारभार काही लोकांनी आरंभलेला दिसून येत आहे. जिथे हे भव्यदिव्य आयोजन पार पडले त्या बल्लारपूर नजिकच्या विसापूर येथील क्रीडा संकुलात वीज कनेक्शन कापण्याचा जो अश्लाघ्य प्रकार घडला तो अनायासेच घडला, तो केवळ योगायोग होता की पंधरवड्यापूर्वीच्या देशपातळीवरील अत्युत्तम आयोजनाने‌ पोटशूळ उठलेल्यांच्या कावेबाज कृत्याचा तो परिपाक होता, असे अनेक प्रश्न आता यासंदर्भात उपस्थित झाले आहेत.

निधी उपलब्ध असताना वीजबिल थकीत ठेवणारी यंत्रणा, बील भरायला जरासा उशीर झाला म्हणून वीज पुरवठा खंडित करायला तत्परतेनं सरसावलेले वीज मंडळाचे कर्तृत्ववान कर्मचारी, वीज पुरवठा खंडित झालाय् म्हटल्यावर आयतेच कोलीत हाती लागल्यागत आनंदाच्या उकळ्या फुटलेले काही नतद्रष्ट लोक, वीजबिल भरण्यासाठी भिक मागण्याच्या आंदोलनाची नौटंकी करण्याची संधी साधून गेलेले राजकारणी… हा साराच प्रकार, खेळाडूंची मनं खोलवर उद्विग्न करून गेला आहे. शंखनादशी बोलताना काही नामांकित खेळाडूंनी या एकूणच प्रकरणाला कारणीभूत ठरलेल्या दर्जाहीन वृत्तीवर बोट ठेवत, त्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, गेले दोन महिने थकलेले बील वसूल करण्यासाठी वीज जोडणी तोडण्याची कारवाई कधी नव्हे एवढ्या वेगवान गतीने पूर्ण करणाऱ्या वीज मंडळाला, चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने थकीत बिलाची दोन लक्ष नऊ हजार रुपयांची रक्कम अदा केल्यानंतर हा वीज पुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झाला असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे.

पण पुरवठा खंडित झाल्यावर ही रक्कम तातडीने अदा करणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने बील भरायला अक्षम्य दिरंगाई का केली, हे कार्यालय ही लाजिरवाणी स्थिती उद्भवण्याची वाट बघत होते का? असे अनेक प्रश्न यासंदर्भात उपस्थित होताहेत. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांबद्दल काय बोलावे? संपूर्ण जिल्ह्यात वीज बिल थकीत असलेल्या शासकीय कार्यालयांची यादी हातभर लांब झालेली असताना राष्ट्रीय पातळीवरील एक आयोजन नुकतेच पार पडलेल्या विसापूरच्या या क्रीडा संकुलावर त्यांची नजर अग्रक्रमाने जावी, याबाबतही संशय घ्यायला जागा असल्याचं मत या परिसरात व्यक्त होऊ लागलं आहे. शंखनादकडे भावना व्यक्त करणाऱ्या खेळाडूंनीही नेमकेपणानं त्यावर बोट ठेवलं आहे. या थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या भिक मागण्याच्या आंदोलनामागील राजकारण देखील आता लपून राहिलेले नाही. मात्र, एकूणच या घटनाक्रमात आपण खेळाची शान घालवत आहोत, याची सल कोणाच्याच मनात असू नये, हे अधिक वेदनादायक ठरले…