
मुंबई : “न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद न करुन बाबासाहेबांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला..”, असे वक्तव्य काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आव्हाड यांच्या या वक्तव्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर आव्हाड यांनी घूमजाव केले आहे. “न्यायपालिकेच्या काही निर्णयातून जातीयतेचा वास येतो”, असे वक्तव्य त्यांनी नागपुरात केल्याचे काही प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. त्यावर आता आव्हाड यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय.
“आपण असे वक्तव्य केलेले नाही..” असा दावा आव्हाडांकडून करण्यात आलाय. मी कुठेही न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो, असे बोललेलो नाही, असे ते म्हणाले.
आव्हाडांच्या कालच्या कथित वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, भाजप नेते आशीष देशमुख या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. आव्हाडांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “न्यायव्यवस्थेत आरक्षण न देण्याचे धोरण बाबासाहेबांची पूर्ण चिंतन करून आखले आहे. त्यावर भाष्य करणे अयोग्य आहे.” आशीष देशमुखांनीही आव्हाडांना जाब विचारला आहे. आव्हाड बाबासाहेबांपेक्षा मोठे विचारवंत झाले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून आंबेडकरी जनतेला दुखावण्याचे काम केलेय अशीही टीकाही त्यांनी केली. आव्हाड नैराश्याने ग्रासले असून चर्चेत राहण्यासाठी ते केविलवाणा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.