Home Vidarbha विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

0

चंद्रपूर (CHANDRAPUR):
आकाशवाणी पासून जगन्नाथ बाबा नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रविवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्यामुळे रस्त्यावरून सायकलने जाणाऱ्या एका 60 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. प्रभाकर गणपत क्षीरसागर असे मृतकाचे नाव असुन ते दाताळा येथील रहिवासी होते.
सविस्तर असे की जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून उच्च दाबाची 11 केव्ही विजेची तार जाते. काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास मोठे वादळ आले. परंतु त्याच्या 1 तास आधीच जवळपास सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट सारखा आवाज झाला व ही 11 केव्हीची तार तुटून रस्त्यावर पडली. काही स्थानिक नागरिकांनी विज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली.4 वाजून 59 मिनिटांनी तक्रार केल्याची नोंद आहे. सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज पुरवठा बंद केला नाही. पडलेली तार सुद्धा उचलली नाही. तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर मात्र सायंकाळी 6 वाजता तक्रारीचा निपटारा झाल्याचा ऑनलाइन मेसेज महावितरणकडून पाठविण्यात आला.

यादरम्यान जनता महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षक असलेले दाताळा येथील रहिवासी प्रभाकर गणपत क्षीरसागर सायकलने सायंकाळच्या ड्युटीवर चालले होते. रस्त्याने जात असताना सायकलच्या चाकात विजेचा तार अडकून ते पडले व तारेला स्पर्श झाला.11 केव्हीच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. देशमुख यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा तसेच रामनगर विज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता कुणाल पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी मृतकांचे कुटुंबीय तसेच दाताळा व जगन्नाथबाबा नगर मधील रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका उपस्थित नागरिक व मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर सहाय्यक अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.

महावितरणच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – जनविकास सेनेची मागणी

नागपूर व दाताळा मार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याने हजारो नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. अशा वर्दळीच्या रस्त्यावर दीड तास 11 केवी विजेची जिवंत तार पडून राहणे अत्यंत धोकादायक आहे. यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.