देशातील १९९ जिल्हा कृषी हवामान केंद्र बंदचा निर्णय

0

 

NAGPUR देशात २०१८-१९ या वर्षात जिल्हा कृषी हवामान केंद्र (District Agromet. Unit) भारतीय हवामान विभाग व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या समन्वयाने एकूण १९९ जिल्ह्यात स्थापन करण्यात आली. या जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे हवामानाचा अचुक अंदाज, हवामान आधारित कृषी सल्ला शेतकरी बंधूंना आठवड्यातून दोनदा मंगळवारी व शुक्रवारी प्राप्त होत असे.

या आधारे शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांचे व इतर घटकांचे योग्यप्रकारे व सुक्ष्मपणे नियोजन करीत होते. याव्यतिरिक्त हवामानात होणारे अचानक बदल जसे की, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट, शीत लहर, पावसाचा खंड ई. विषयी जिल्हा कृषी हवामान केंद्र त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावध करीत असे व शेतकरी सजग होऊन आपले पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यास सक्षम होत असे. अशा या हवामान आधारित कृषी सल्ला सेवेमुळे देशातील शेतकरी वर्गाला आजमितीस करोडो रुपयांचा फायदा झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु पृथ्वी विज्ञान मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या दि.१७.०१.२०२४ च्या पत्रानुसार( DGM-HQ-35023/2/2021-AASD Part (1)(E-27044) देशातील शेतकरी हितार्थ काम करणारी ही १९९ जिल्हा कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ०१.०३.२०२४ पासून हवामान आधारित कृषी सल्ला सेवा प्राप्त होणार नाही. यात शेतकरी बंधुंचे फार मोठे नुकसान आहे.

सरकारचा हा निर्णय देशातील असंख्य शेतकऱ्यांसाठी, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी उत्पादक कंपन्या व शेती क्षेत्रासाठी चिंताजनक असून शेवटी याचे नकारात्मक रूपांतर राष्ट्रीय आर्थिक विकास दरात होणार असल्याची भिती आहे. याचा पुनर्विचार करून शेतीला राष्ट्राच्या विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकारने ही जिल्हा कृषी हवामान केंद्र पुर्ववत सुरू ठेवावी हीच शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे.