
पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्काराने गौरव
नागपूर(Nagpur): अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस (एएमएस), नागपूर यांच्या वतीने १४ व १५ मार्च रोजी आयोजित वार्षिक वैद्यकीय परिषदेत आधुनिक वैद्यकशास्त्रातील महत्त्वाच्या विषयांवर सखोल मंथन झाले. देशातील विविध क्षेत्रांतील वैद्यकीय तज्ज्ञ, चिकित्सक, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेत जन्मजात आजारांचे निदान, औषधोपचारांचे संभाव्य दुष्परिणाम, तसेच आधुनिक शल्यक्रिया आणि निदान तंत्रज्ञान यांवर विचारमंथन करण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रात एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारे आनुवंशिक आजार तसेच जन्मजात व्याधी घेऊन जन्माला येणाऱ्या बालकांचे वेळेवर निदान व उपचार आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे शक्य होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. दीर्घकालीन औषधोपचारांमुळे शरीरावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांचेही प्रभावी व्यवस्थापन करता येते, असेही या परिषदेतून स्पष्ट झाले.
परिषदेच्या पहिल्या दिवशी डॉ. एम. टी. पैठणकर हॉल, आयएमए हाऊस, अंबाझरी रोड येथे संशोधन निबंध सादरीकरणाचे सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात औषधशास्त्र, शल्यक्रिया, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, कान-नाक-घसा, न्यूरोलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी अशा विविध शाखांतील १८ शोधनिबंध सादर करण्यात आले. दुर्मिळ वैद्यकीय घटना, औषधांचे शरीरावरील दुष्परिणाम आणि शस्त्रक्रियेचे नियोजन या विषयांवर तज्ज्ञांनी संशोधनात्मक माहिती मांडली.
या सत्राचे परीक्षक म्हणून डॉ. राधा मुंजे, डॉ. कुश झुनझुनवाला आणि डॉ. दिविश सक्सेना यांनी काम पाहिले. सत्राचे संयोजन डॉ. अर्चना देशपांडे यांनी केले, तर डॉ. वर्षा सर्दा, डॉ. यश बानाईत आणि डॉ. ऋजु चिमोटे यांनी समिती सदस्य म्हणून सहकार्य केले. संशोधन सादरीकरणात डॉ. पंकज द्विवेदी यांना प्रथम, डॉ. नितीन लोहिया यांना द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच उत्कृष्ट केस पेपर सादरीकरणासाठी डॉ. राजेश मुंदडा यांचा सन्मान करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ येथे विविध वैद्यकीय विषयांवरील शैक्षणिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांचे सूत्रसंचालन डॉ. रोमा सरनाईक, डॉ. निराली लोहिया, डॉ. अपूर्वा मुखर्जी आणि डॉ. शिल्पा जैस्वाल यांनी केले.
या परिषदेत श्वसनविकार, हृदयरोग, शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या गुंतागुंती, न भरणाऱ्या जखमांचे व्यवस्थापन तसेच फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वेळेवर निदान अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. छातीविकार चिकित्सक डॉ. अभिषेक फाये यांनी COPD संदर्भातील नव्या उपचार पद्धतींवर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज हरकूट यांनी हृदयविकार उपचारातील आव्हानांवर, मेंदूविकार शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गिरी यांनी मेंदूतील गाठींवरील शस्त्रक्रिया तंत्रावर तर पुणे येथील डॉ. विक्रम वाघ यांनी न भरणाऱ्या जखमांमध्ये डर्मल मॅट्रिक्सच्या उपयोगावर मार्गदर्शन केले. याशिवाय डॉ. राजेश मुंदडा, डॉ. संकेत पेंडसे आणि डॉ. शंतनू पेंडसे यांनी निदान व उपचार क्षेत्रातील नव्या संशोधनावर प्रकाश टाकला.
पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा सन्मान

या परिषदेत व्यावसायिक उत्कृष्टता (प्रोफेशनल एक्सलेन्स) पुरस्काराने जेष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा गौरव करण्यात आला. जेष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी डॉ. मेश्राम यांचा आजवरचा कार्यप्रवास आणि योगदानाचा आपल्या खुमासदार शैलीत परिचय करून दिला. तसेच यंग अचिव्हर पुरस्काराने मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. विशाल रामटेके यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. मुकुंद थत्ते यांचे सादरीकरण ठरले प्रमुख आकर्षण
प्रतिष्ठेच्या डॉ. वऱ्हाडपांडे स्मृती व्याख्यानमध्ये मुंबईचे ज्येष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. मुकुंद थत्ते यांनी दिलेले “मानवी हाताच्या अंगठ्याची उत्क्रांती आणि त्याची पुनर्रचना” या विषयावरील माहितीपूर्ण व रंजक सादरीकरण हे या परिषदेचे प्रमुख आकर्षण ठरले.
ही परिषद एएमएसचे अध्यक्ष डॉ. नैनेश पटेल, परिषद अध्यक्ष डॉ. शिवनारायण आचार्य, पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. राजू खंडेलवाल, कोषाध्यक्ष डॉ. अर्चना देशपांडे आणि मानद सचिव डॉ. समीर जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. दोन्ही दिवसांच्या सत्रांचा समारोप डॉ. समीर जहागीरदार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
वैद्यकीय क्षेत्रातील नव्या संशोधनाला चालना देत चिकित्सकांमधील ज्ञानविनिमयाला बळ देणारी ही परिषद नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.















