वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

0

 

(Buldhana)बुलढाणा- सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे पानगळ होत असून, लाखो रुपये खर्चून पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहा. खामगाव तालुक्यात रब्बी हंगामात ३३ हजार ८४८ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कांद्याची ३६८३ तर भाजीपाल्याची ११२६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

रात्री उच्च सापेक्ष आर्द्रता व दिवसा कमी सापेक्ष आर्द्रता तसेच २२ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान असे वातावरण असल्याने या रोगाचा प्रसार वाढला आहे. यामुळे मिरची, मुळा, फुल कोबी सह ज्वारीचे सुध्दा पानगळ होत आहे. झाडांची संपूर्ण पाने गळून पडत असून, झाडे सुकत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी फवारणी करीत आहेत. मात्र, फवारणी केल्यावरही पानगळ सुरूचं आहे. भाजीपाल्याचे बियाणे व फवारणीचा खर्च लाखो रुपयांमध्ये होतो. भुरी रोगामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव राहणार आहे.

गेल्या हंगामात कापूस. तूर. सोयाबीन पिकाची लागवड केली होती. मात्र, त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या बागायतीमध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र, त्यावर आता भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची व्यथा भाजीपाला उत्पादक शेतकरी योगेश लाहुडकर, आकाश सोनोने यांनी बोलून दाखविली.