पंतप्रधान आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

0

नवी दिल्ली(New Delhi): देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात असतानाच निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात दोन्ही नेत्यांना 29 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित आचारसंहिता उल्लंघनाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. आयोगाने 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदावरील लोकांच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात. नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 77 अंतर्गत ‘स्टार कॅम्पेनर’चा दर्जा देणे हे पूर्णपणे राजकीय पक्षांच्या कक्षेत आहे आणि स्टार प्रचारकांनी उच्च दर्जाच्या भाषणात योगदान देणे अपेक्षित आहे.

काही दिवसापूर्वी, राजस्थानमधील बांसवाडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास ते घुसखोर आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्यामध्ये देशाची संपत्ती वाटू शकते. पीएम मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने प्रत्युत्तरात म्हटले की, पंतप्रधानांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांनी निवडणूक आयोगाकडे या मुद्द्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

 

543 पैकी 10 जागा लढणाऱ्यांवर विश्वास बसेल का?:
फडणवीस यांची शरदचंद्र पवारच्या जाहीरनाम्यावर टीका
देशात 543 लोकसभा मतदारसंघांपैकी जे 10 लोकसभा मतदारसंघातील जागा लढवत आहे, ते जाहीरनामा प्रसिद्ध करतात आणि त्यावर आम्ही असे करू तसे करू, असे म्हणतात. यावर कोणाचा विश्वास बसेल का? असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विचारला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला. यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केले नाही त्यामुळे आम्हाला करावे लागत असल्याची टीका, जाहीरनामा प्रसिद्ध करताना राष्ट्रवादीने केली होती. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार गटाचा शपथनामा ही जनतेची फसवणूक
चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. भाजपा आणि काँग्रेस जाहीरनाम्यावरून एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला शपथपत्र असे नाव दिले आहे. या जाहीरनाम्यावरून भाजपाने शरद पवार गटावर हल्लाबोल केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

प्रत्येक मतदारसंघात सभा घेणारा पहिला पंतप्रधान
विजय वडेट्टीवार यांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढ्या सभा का घेत आहे याचे आश्चर्य वाटत आहे. भाजपच्या सर्वे किंवा आयबी इंटेलिजन्स सर्विसेसचा रिपोर्टमध्ये पराभव होणार असे आले असेल, म्हणून ते सभा घेत आहे. सत्तर वर्षात प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये सहभाग घेणारे पंतप्रधान आम्ही पाहिलेच नाही, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाणला. शरद पवारांनी सभेत मोदींचा व्हिडिओ दाखवला. त्यावर बोलतानाही टीका विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

पाल हॉटेलला आग; 6 जणांचा मृत्यू
तीन हॉटेलदेखील जळून खाक
पाटणा जंक्शनपासून 50 मीटर अंतरावर असलेल्या पाल हॉटेलला गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीने आजूबाजूच्या तीन हॉटेलदेखील जळून खाक झाल्या. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुष आहेत. शहराचे एसपी सेंट्रल सत्यप्रकाश यांनी सांगितले की, जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 20 लोक सध्या PMCH मध्ये उपचार घेत आहेत. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.

प्रीतम मुंडेंना नाशिकमधून लढवण्याची चर्चा
छगन भुजबळांचा पंकजा मुंडेंना सल्ला

नाशिक लोकसभा मतदार संघातून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देईल, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यावर आता छगन भुजबळ यांनी पंकजांना सल्ला दिला आहे. पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रीत करावे, त्या तेथून निवडून येणे महत्त्वाचे असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये उमेदवार नाही ही अडचण नाही तर जास्त उमेदवार आहेत, ही अडचण असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर वंजारी समाजाचेही अनेक उमेदवार आमच्याकडे असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

निवडणूक कर्मचारीही मतदानापासून वंचित
मतदानाच्या टक्केवारीवरून विविध संघटनांची तक्रार

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतदानाच्या टक्केवारीवरून विविध संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच अनेक नागरिकांनी नावे मतदार यादीत नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान गेल्या १९ एप्रिल रोजी पार पडले. निवडणूक प्रक्रीया यशस्वी करण्यासाठी कर्मचारी रात्रंदिवस राबले. परंतु, त्यापैकीच अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांनाच मतदानापासून वंचित राहावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शुक्रवारपासून कौन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन

एकही ब्रेक न घेता केली आठ तास शूटिंग

26 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर तुम्हाला कौन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन हे बघता येईल. विशेष म्हणजे तुम्ही कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि करोडपती होऊ शकतात. थेट बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या पुढे बसून कौन बनेगा करोडपती खेळत त्यांच्याशी गप्पा देखील मारू शकता. अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीजनमुळे चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन यांनी नुकताच खुलासा केला की, एकही ब्रेक न घेता त्यांनी कौन बनेगा करोडपतीची आठ तास शूटिंग केली. यावेळी सेटची झलक दाखवताना देखील अमिताभ बच्चन हे दिसले. कौन बनेगा करोडपतीचे सीजन 16 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे.