
नागपूर (nagpur),
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्य बसस्थानकावर हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात 15 मे रोजी अ वर्गात येणाऱ्या नागपूर विभागातील गणेशपेठ बसस्थानकाचे सर्वेक्षण करून पहिले मूल्यांकन करण्यात आले. प्रादेशिक मूल्यांकन समितीमधील पुणे प्रदेशच्या प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, पुण्याचे प्रादेशिक अभियंता कार्तिक सहारे, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर आणि पत्रकार अमित रामटेके
यांनी गणेश पेठ बसस्थानकाचे मूल्यांकन करताना, समितीतर्फे बसस्थानक, परिसरासह पुरुष व महिलांच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता, बसस्थानकाची रंगरंगोटी, बसस्थानकाचे नाव व फलाटावरील फेरीनिहाय गावाचे फलकांचे निरीक्षण केले. बसस्थानकावरील चौकशी खिडकीच्या बाजूला वेळापत्रक, उद्घोषक यंत्रणा, प्रवाशांच्या तक्रारी – सूचना, संबंधित बसस्थानकासह आगार व आगार व्यवस्थापकांचे भ्रमणध्वनी क्रमांक, चालक – वाहकांचे विश्रांती गृह व स्थानकावरील चौकशी, आरक्षण, विद्यार्थी व सर्वसामान्य व्यक्तींसाठी मासिक पास खिडकीची सुविधा, वाणिज्य आस्थापना आणि पार्किंग व्यवस्थेबद्दल सर्वेक्षण करण्यात आले. या अभियानातील अ वर्गातील बसस्थानकाचे चार वेळा मूल्यांकन होणार आहे. प्रादेशिक समितीतर्फे नागपूर विभागातील काटोल व गणेशपेठ बसस्थानकाचे प्रथम मूल्यांकन करण्यात आले आहे. यानंतर अजून तीन वेळा मूल्यांकन होणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.
यावेळी नागपूर विभाग नियंत्रक विनोद चौरे, वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे, आगार प्रमुख अभय बोबडे आणि कामगार अधिकारी भारती कोसरे आदी उपस्थित होते.