Home MAHARASHTRA वि. सा. संघाला पुनर्वैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी आर्थिक सहकार्य करा…

वि. सा. संघाला पुनर्वैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी आर्थिक सहकार्य करा…

0

डॉ. गिरीश गांधी यांचे आवाहन, मित्र परिवाराच्‍यावतीने हृद्य सत्‍कार

नागपूर (Nagpur), दि. 18 एप्रिल :
विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या विदर्भ साहित्य संघाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी मनोभावे सहकार्य करावे, असे आवाहन विदर्भ साहित्‍य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी केले.
डॉ. गिरीश गांधी यांच्‍या मित्र परिवाराच्‍यावतीने रविवारी सत्‍कार सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री रमेश बंग, नागपूर विभागाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव, नगरसेवक अतुल कोटेचा यांच्‍यासह मंचावर संतोष क्षीरसागर, निलेश खांडेकर व डॉ. बबन तायवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते डॉ. गिरीश गांधी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. गांधी म्हणाले की, संघाचे वैभव एकेकाळी अत्यंत उज्ज्वल होते. आताची इमारत आणि सभागृह देखील चांगले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत वि.सा. संघ अनेक अडचणी आणि आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. संघाच्या उभारणीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून “एक व्यक्ती – एक हजार” या संकल्‍पनेनुसार सर्वांनी हातभार लावावा. यासंदर्भातील निर्णय सकाळी कार्यकारिणीच्या पहिल्‍या बैठकीत घेण्यात आला. नंतर एकाच दिवसात सुमारे दीड लाख रुपये जमा झाल्याची माहिती डॉ. गिरीश गांधी यांनी यावेळी दिली. शिवाय, कार्यक्रम सुरू असताना उपस्थितांपैकी काहींनी स्वयंस्‍फूर्तीने वर्गणी दिली.
गजानन निमदेव यांनी डॉ. गांधी व त्‍यांच्‍या कार्यकारिणीतील सदस्‍यांना शुभेच्छा देताना, डॉ. गांधी यांच्‍या नेतृत्‍वात विदर्भाचे सांस्कृतिक वैभव पुन्हा उजळेल आणि साहित्य क्षेत्र अधिक समृद्ध होईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. अध्‍यक्षीय भाषणातून रमेश बंग म्हणाले की, डॉ. गांधी यांच्‍या नेतृत्वात साहित्य क्षेत्राला नवी दिशा मिळेल. नव्या पिढीत साहित्याविषयी ओढ निर्माण करण्यासाठी त्‍यांनी विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचविले. अतुल कोटेचा यांनीही शुभेच्छा देत वि. सा. संघाच्या कार्याला पाठिंबा दर्शविला.
यावेळी संतोष क्षीरसागर, निलेश खांडेकर व अतुल कोटेचा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राज्‍याचे माहिती आयुक्‍त राहूल पांडे, प्रा. शरद पाटील, भास्कर पाटील, लोकमतचे यदु जोशी, सकाळचे संपादक प्रमोद काळबांडे, श्रीपाद अपराजित यांच्‍यासह वि. सा. संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व मित्र परिवार मोठ्या संख्‍येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळासाहेब कुलकर्णी यांनी केले.

 

#NagpurNews #Vidarbha #VidarbhaSahityaSangh #MarathiSahitya #CulturalHeritage #BreakingNews #MaharashtraNews #SupportCause #DonationDrive #CommunitySupport #LocalNews #NewsUpdate #ViralNews

—————————————–