‘या’ राज्यांमध्ये २२ ला शासकीय सुटी!

0

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने २२ जानेवारीला उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा सोहळा देशभर दिवाळीप्रमाणे साजरा व्हावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजप, शिंदे गटाकडूनही आता ही मागणी पुढे आली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी याबाबतचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत आज घोषणा केली. (Goa Chief Minister Dr. Pramod Sawant)गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी २२ जानेवारी रोजी गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रातही ही मागणी होत आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने राज्यामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजप आमदार प्रवीण पोटे यांची केली आहे.

(Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 22 जानेवारीला सरकारी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राम मंदिर सोहळ्याला दिवाळीचे स्वरूप दिले असल्याने राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा सोहळा पाहता यावा म्हणून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी पोटे यांनी केली आहे.

आनंदाचा शिधा

दरम्यान, राज्य सरकारने या सोहळ्याच्या निमित्ताने तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारी पासून साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे दीड कोटींवर शिधापत्रिकाधारकांना देण्यास मान्यता दिली आहे.