सुनील केदार पुन्हा अडचणीत, पण कशामुळे?

0

 

(Nagpur)नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात दोषी आढळलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते सुनील केदार कारागृहातून सुटल्यावर पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कारागृहातून सुटल्यावर विनापरवाना मिरवणूक काढल्याने त्यांच्या विरुद्ध नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधारावर आता पोलिसांकडून त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहितीही मिळत आहे.

माजी मंत्री (Sunil Kedar)सुनील केदार यांना नुकताच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कारागृहामधून सुटका करण्यात आली. एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तर केदार यांची जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तर काहींनी मोठा जल्लोष करत मोठी रॅली देखील काढली. हेच प्रकरण त्यांना पुन्हा भोवले आहे.

सुनील केदार, यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर कुंभारे, विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष कुंदा राऊत, जिल्हा परिषदेच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे, अनिल राय, संजय मेश्राम, विष्णु कोकड्डे यांच्यासह इतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा धंतोली पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या आधारावर केदार यांचा जामीन रद्द होणार की कसे, याकडे लक्ष लागले आहे.