राम मंदिर सोहळा, अडवानींनी घेतला ‘हा’ निर्णय

0

 

(New Delhi)नवी दिल्ली– २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीही (Senior BJP leader LK Advani )सहभागी होणार का, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. मध्यंतरी काही विहिंप नेत्यांच्या विधानामुळे वादही निर्माण झाला होता. मात्र, आता यासंदर्भात ताज्या घडामोडी पुढे आल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार यांनी यासंदर्भात अपडेट दिले आहेत. प्रकृतीमुळे अडवानी उपस्थित राहणार नाही, असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते.

मात्र, आता या सोहळ्याला अडवानी उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात येत आहे.
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना राममंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते.

अडवाणी आणि जोशी यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव या नेत्यांनी उपस्थित राहणे टाळावे, असे आवाहन सुरुवातीला विहिंपकडून करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. विहिंप नेत्यांच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीकाही केली होती. मात्र, आता अडवानी हे या सोहळ्यात सहभागी होतील, अशी माहिती आहे. त्यांना उपस्थित राहता यावे, यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राम मंदिर निर्माणाच्या चळवळीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी काढलेल्या यात्रेमुळे देशभरात या प्रश्नावर जागृती झाली.

काँग्रेसचा नकार

दरम्यान, राम मंदिर सोहळ्यात सहभागी होण्यास काँग्रेसने कालच अधिकृतरित्या नकार दिला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यासंदर्भात घोषणा करताना सांगितले की, राम मंदिर उद्घाटन सोहळा हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला असल्याने त्यात आम्हाला सहभागी होण्याची कुठलीही इच्छा नाही. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. दरम्यान, काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी पक्षाला घरचा अहेर दिलाय. आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, राम कोणत्याही पक्षाचा नाही. आमची लढाई राम किंवा अयोध्याशी नाही तर भाजपशी आहे. काही लोक काँग्रेसला डाव्या मार्गावर घेऊन जात आहेत. काँग्रेस नेतृत्वाने अयोध्येला न जाण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी माझी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.