Home Artical Blog तळोधी येथे समोरासमोर धडक; ४ जणांचा जागीच मृत्यू, ११ जखमी

तळोधी येथे समोरासमोर धडक; ४ जणांचा जागीच मृत्यू, ११ जखमी

0

जखमींवर तातडीने उपचाराचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव

गडचिरोली(Gadchiroli): गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील तळोधी परिसरात स्कॉर्पिओ आणि ट्रॅव्हल्स वाहनामध्ये झालेल्या तीव्र अपघातात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ही दुर्घटना आज सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास तळोधी येथील नव्या पेट्रोल पंपाजवळ घडली. कुरुल-रामपूर येथून भाडभीडीकडे विवाह समारंभासाठी निघालेल्या स्कॉर्पिओ (MH 46 P 5392) या वाहनाची गडचिरोलीकडून येणाऱ्या ‘प्रवीण टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ (MH 15 CK 5005) या वाहनाशी समोरासमोर जोरदार धडक झाली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व श्री. गोकुल तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत जखमींवर त्वरित आणि प्रभावी उपचार करण्याचे आदेश दिले. आवश्यक औषधसामग्री, मनुष्यबळ आणि आरोग्य सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच जखमींच्या नातेवाईकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

अपघातातील जखमींना तळोधी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना सांत्वन देत प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा दिलासा दिला.

मृतांची नावे :
अनिकेत बर्लावार (वय 26, भाडभीडी), आरोही मोगरकर (वय 8, गट्टेगुडा), सुमन गव्हारे (वय 60, कुणघाडा), विमलाबाई गव्हारे (वय 60, कुणघाडा)

जखमींची नावे :
(1) गुरुदेव कुणघाडकर, (2) सुधाकर कुणघाडकर, (3) वेदांत वैरागडे, (4) प्रतिमा मानमुडकर, (5) निखिल दराडे, (6) संजय वैरागडे, (7) कुणाल कन्नाके, (8) रेखा चलाख, (9) अमर चलाख, (10) देवाजी गव्हारे, (11) गुरुदास वासेकर